प्रमुख चौकांतील वाहतूक ठप्प; वृक्ष, फांद्या कोसळल्याच्या अनेक घटना; नालेसफाईचा बोजवारा
गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणातील उष्म्याने उच्चांक गाठला असतानाच गुरूवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पहिल्याच पावसाने मात्र सांगली तुंबली. प्रमुख रस्त्यांसह चौक जलमय झाले. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वृक्ष, फांद्या पडल्याच्या घटनांनी शहरवासिय भयभित झाले. नालेसफाई आणि गटारी स्वच्छ केल्याचा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरवला.
गुरूवारी दिवसभर पारा चाळीशीच्या वर होता. घामाच्या धारांनी लोक वैतागले असतानाच सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक अंधारून येऊन पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर सांगली कुपबाडसह परिसराला जोरदार पावसाने झोडपले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्याचबरोबर वृक्षांच्या फांद्या पडण्याचेही प्रकार घडले. सांगली स्टँड, अबिडकर रोडवरील अण्णाभाऊ साठे नगर, जयमातृभूमी व्यायाम मंडळाशेजारच्या खोक्यांवर झाड व फांद्या पडल्याचे तर सांगलीवाडीत घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
या पावसाने महापालिका चौक, राजवाडा चौक, एस. टी. स्टँड रोड, झुलेलाल चीक, डॉ. आंबेडकर रोड, शिवाजी मंडई, मारूती चौक, सिटी पोस्ट ते स्टेशन रोड, राम मंदिर चौकाच्या दोन्ही बाजुंनी पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे सांगलीत येणारे आणि बाहेर पडणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मार्केट यार्ड, कॉलेज कॉर्नर, हरभट रोड, कर्नाळ रोड, सांगलीवाडीकडे जाणाऱ्या विविध मार्गांवरही पाणी साचल्याने वाहन चालकांना पाण्यातून वाहन चालवणे मुश्किलीचे बनले. शहरात पादचाऱ्यांनाही रस्ते बदलून गल्ली बोळातून गटारीच्या तुंबून बाहेर पडलेल्या पाण्यातून चालत जावे लागले. सायंकाळी उशीरा परिस्थिती सुधारली. मात्र तरीही रस्त्याकडेला साचलेल्या पाण्यात तुंबलेल्या पावसाचे प्रतिबिंब नागरिकांना दिसतच राहिले. अनेक भागात कदाचित उद्याही ते तसेच दिसेल. शहर परिसरात जवळपास सर्व चौकांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. मारूती चौकात तर निचरा होत नसल्याने बराच वेळ पाणी थांबून होते. त्यामुळे भाजीपाला विक्रेते, हातगाडी आणि फेरीवाल्यांची चांगलीच त्रेधा उडाली. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शहराच्या बाहेर हरिपूर रोड, कोल्हापूर रोड सांगलीवाडी येथे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडल्याच्या आणिः फांद्या पडल्याच्या घटना घडल्याने बीज पुरवठा विस्कळीत झाला. वाहतूक मुंगीच्या पावलाने सुरू होती. पहिल्याच पावसाने शहराची दैना उडाली. तर नाले सफाई सह महापालिकेच्या कामाचा बोजवारा उडाला.