दिल्ली, मुंबई, पुणे शहरांना विमानफेऱ्या : सांगली-कोल्हापूरच्या प्रवाशांसाठीही ठरणार सोयीचे
बेळगाव : बेळगावमधील विमान प्रवाशांसाठी ऑक्टोबर महिना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, गुरुवार दि. 5 पासून दिल्ली-बेळगाव-दिल्ली तर रविवार दि. 15 पासून बेळगाव-मुंबई मार्गावर रोजची विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच बेळगाव-पुणे विमानही सुरू होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना अत्यंत कमी वेळेत या शहरांना पोहोचणे शक्य होईल.
वर्षभरापूर्वी सुरू असलेली बेळगाव-दिल्ली विमानफेरी अचानक बंद करण्यात आली. यामुळे बेळगावहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना गोवा अथवा हुबळी येथून दिल्लीला पोहोचावे लागत होते. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री, एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल यासह औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संस्था असल्याने मोठ्या प्रमाणात बेळगावहून दिल्लीला प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे बेळगाव-दिल्ली मार्गावर विमानफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून 5 ऑक्टोबरपासून देशाच्या राजधानीत पोहोचता येणार आहे. अवघ्या अडीच तासांमध्ये बेळगावमधून दिल्लीला पोहोचता येणार असल्याने आतापासूनच प्रवाशांचे बुकिंग सुरू आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला आठवड्यातून निवडक दिवस विमानफेरी सुरू होती. रोजची विमानसेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. अखेर प्रवाशांच्या मागणीची दखल घेत रविवार दि. 15 पासून बेळगाव-मुंबई मार्गावर रोजची विमानफेरी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या विमानातून बिझनेस क्लास प्रवासदेखील करता येणार आहे. त्याचबरोबर बेळगाव-पुणे विमानफेरीसाठी हालचाली गतिमान असून या महिन्याच्या अखेरीस ही विमानफेरी सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिना विमान प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
बेळगाव-कोल्हापूर मार्गावर लक्झरी बसची मागणी
गुरुवारपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरीचा शुभारंभ होणार आहे. बेळगावसह लगतच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून दिल्लीला जाण्यासाठी ही विमानफेरी महत्त्वाची ठरते. बऱ्याच प्रवाशांनी या विमानफेरीचा यापूर्वी लाभ घेतला आहे. त्यामुळे विमानफेरीच्या वेळेनुसार बेळगाव विमानतळ ते कोल्हापूर बसस्थानक या मार्गावर लक्झरी बस सुरू केल्यास प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.