ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Thermal screening at Pune airport from today भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. मागची कोरोनाची परिस्थिती पाहता आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर आजपासून बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी थर्मल स्क्रिनिंग सुरू करणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
पुणे हे आयटी हब असल्याने शहरात अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत. याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही पुण्यात शिक्षण घेतात. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही आजपासून विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहोत.
अधिक वाचा : खा. नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या; अटक वॉरंटची अंमलजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश
पुणे शहरात सध्या 44 ऍक्टीव्ह कोरोना रुग्ण असून सर्व रुग्णांची प्रकृती ठीक आहे. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लसीकरणामध्ये पुणे शहर अग्रेसर असून दोन्ही डोसबाबत शहरात 99 टक्के लसीकरण झाले आहे. बूस्टर डोसबद्दल देखील आपल्याकडे भरपूर साठा आहे. ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही, त्यांनी देखील लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन बिनवडे यांनी केले आहे.