विषारी साप चावून माणसाचा किंवा जनावराचा मृत्यू होणे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच आपण कोणत्याही सापापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतो. साप विषारी नसला तरी आपण त्याच्या जवळ जात नाही कारण तो नेमका कसा आहे हे आपल्यापैकी बहुतेकांना त्याच्याकडे पाहिल्यानंतर कळत नाहीं. पृथ्वीवरच्या बहुतेक सर्व लहान मोठ्या प्राण्यांना विषारी साप चावल्यास त्यांचा मृत्यू होतो.
तथापि, या अजब दुनियेत असे काही प्राणी आहेत, की ज्यांना सापाचे विष मारु शकत नाही. त्यांच्या शरीरात सापाच्या विष पसरतच नाही. त्यामुळे विषारी सापाने दंश केला तरी त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. असे आतापर्यंत ज्ञात झालेले सहा प्राणी असून त्यांच्यापैकी अनेक छोटे आहेत.
हनी बेजर्स या प्राण्यावर सापाच्या विषाचा कोणताही परिणाम होत नाही. या प्राण्याच्या रक्तात असे गुण आहेत, की ज्यांमुळे सापाचे वीष प्रभावहीन होते आणि ते शरीरात न पसल्याने हा प्राणी वाचतो. इतकेच नव्हे, तर तो विषारी सापांना मारुन खातो. असाच गुणधर्म वुडरॅट किंवा वनउंदरातही आहे. कॅलिफोर्निया ग्राऊंड स्क्विरल, रानडुक्कर किंवा काही प्रकारची साधी डुकरे यांना विषारी सापांपासून धोका नसतो. युरोपातील बहुतेक सर्व देशांमध्ये सापडणारा हेजहॉग हा प्राणी सर्पविषापासून सुरक्षित आहे. तसेच भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आढळणारे मुंगूस हे देखील सर्पविषाचा कोणताही परिणाम न होणारे आहे. इतकेच नव्हे, तर मुंगूस आणि विषारी नागसर्प यांच्यात संघर्ष झाला तर बहुतेकवेळा मुंगूसच नागाचा बळी घेते, हे आपण कित्येक व्हिडीओमधून पाहिले आहे.