भारतात साडी हे पारंपरिक आणि लोकप्रिय वस्त्र आहे.साडी नेसायला जरी अवघड असली तरी,प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य साडीमध्येच खुलून दिसते.कोणताही पारंपरिक लुक हा साडीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भारतात प्रत्येक प्रांतातील साडीचा प्रकार व नेसण्याची पद्धत निरनिराळी आहे. जसे राजस्थान – बांधणी, घागरा ओढणी, दक्षिण भारतातील नारायण पेठी, इरकली, पोचमपल्ली कांजीवरम, तर महाराष्ट्राची जरीची नऊवार, सहावार व बनारसचा शालु असे बरेच प्रकार भारतभर प्रसिद्ध आहेत.पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्या साड्या असायलाच हव्यात हे सांगणार आहोत
१) पैठणी साडी
महाराष्ट्राची पारंपरिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पैठणी साडीला ‘महावस्त्र’, ‘साड्यांची महाराणी’ असे म्हटले आहेपैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. पैठणीशिवाय लग्नसोहळा अपूर्णच ठरतो असं म्हणायला काही हरकत नाही. या साडीतील पदर जास्त आकर्षक असतो.पदरावर मोर,पोपट,कमळ अशी नक्षीदार कलाकुसर असते जेवढं मोरांच डिझाईन बारीक आणि जास्त तेवढी त्याची किंमत जास्त असते.आजकाल पैठणीचे बरेच प्रकार आले आहेत. शिवाय कोणत्याही कार्यक्रमात पैठणी अधिक उठून दिसते. त्यामुळे अशी एखादी तरी पैठणी तुमच्याकडे असायलाच हवी.
२) बनारसी साडी
सर्वात प्रसिद्ध बनारसी साडी वाराणसीची आहे. ही साडी सोने आणि चांदीच्या जरी भरतकामासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट साड्या अनेक विवाह समारंभांसाठी वापरल्या जातात आणि त्या रेशमापासून बनवलेल्या असतात ज्या नाजूकपणे विणल्या जातात. तुम्ही ही साडी हळदी एंगेजमेंट सारख्या हलक्या फंक्शन्समध्ये नेसू शकता.
३) चंदेरी साडी
मध्य प्रदेशातील चंदेरी शहरातील चंदेरी साडी बनवण्यासाठी शुद्ध रेशीम वापरला जातो.चंदेरी साडीची आणखी एक खासियत म्हणजे तिचा सोनेरी आणि चांदीचा ब्रोकेड पॅटर्न. ही साडी हस्तकलेचे एक अनमोल प्रकार आहे.
४) चिकनकारी साडी
चिकन हा लखनऊ सुई कामाचा प्राचीन प्रकार आहे. हे कापड सजवण्याच्या सर्वोत्तम पद्धतींपैकी एक आहे. या साड्या तुम्ही कोणत्याही पार्टी फंक्शन्समध्ये नेसू शकता.आजकाल चिकनकारी ड्रेसचा ही ट्रेंड चालू आहे.पण चिकनकारी साडी ही तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी नेसू शकता. शिवाय ती हलकी असल्यामुळे तुम्हाला ती सहज वापरता येते
५) इरकल साडी
इरकल साडी कॉटन आणि सिल्क या दोन्ही प्रकारात उपलब्ध असते. अगदी चापूनचोपून बसणारी आणि टिपिकल लूक देणारी साडी म्हणून इरकल साडी ओळखली जाते. अगदी ५०० रूपयांपासून या साड्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.यामुळे ही साडी खरेदी करण्यासाठी स्त्रियांचा जास्त कल असतो.