वधू-वर सूचकच्या माध्यमातूनही फसवणूक सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. वधू-वर सूचक ऍपच्या माध्यमातूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. खोटा बायोडाटा व मुलींचे फोटो पाठवून लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या वरांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. मोठय़ा प्रमाणात हा व्यवसाय सुरू आहे.
धामणे येथील मेहबूब ताशिलदार यांनी सीईएन विभागाकडे तक्रार केली आहे. मेहबूब यांच्या मते वधू-वर सूचक जाहिरांतीमध्ये आलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधला. आपल्या मित्राच्या मुलासाठी मुलगी बघण्याच्या प्रयत्नात असताना आपल्याला एक मोबाईल क्रमांक मिळाला. तेथूनच आपली फसवणूक सुरू झाली.
जाहिरातीत उल्लेख करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. आदी गुगल पेवरून साडेतीन हजार रुपये जमा करा, तुम्हाला वधूंची छायाचित्रे व त्यांचा बायोडाटा पाठविला जाईल, असे सांगण्यात आले. आपल्या मित्राने त्याच्यावर विश्वास ठेवून साडेतीन हजार रुपये पाठविले.
पैसे जमा केल्यानंतर व्हॉटस्ऍपवर एका मुलीचे छायाचित्र व तिचा बायोडाटा आला. बायोडाटामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या पत्यावर चौकशी करण्यासाठी आम्ही सगळे पोहोचलो. त्यावेळी तेथे कोणच नव्हते. त्यांनी दिलेला फोटो, बायोडाटा, पत्ता सारेच खोटे होते. नंतर त्या महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. तिच्याकडूनही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आपण फसलो गेल्याचे आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.