एकाचवेळी पती- पत्नी, मुलगा यांच्या अपघाती निधनाने सांगे तालुक्यासह संपूर्ण गोव्यात हळहळ
सांगे : तारीपांटो, सांगे येथील पुलाजवळ सोमवारी झेन कार नदीत कोसळून मृत्युमुखी पडलेले 38 वर्षीय मिलिंद नाईक यांचा मृतदेह काल मंगळवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवेच्या जवानांनी पाण्यातून वर काढला. त्यांच्या मृतदेहाची शोधाशोध केल्यानंतर नदीकाठी सदर मृतदेह तरंगताना आढळून आला. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलगा दगावल्याने सांगे तालुक्यासह संपूर्ण गोव्यात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. आपण लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तारीपांटो, सांगे येथील पुलाच्या बाजूने सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान झेन कार नदीत कोसळल्याने रेखा नाईक (वय 35 वर्षे) आणि मुलगा देवांश नाईक (वय 2 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली होती. कार चालविणारे पती मिलिंद नाईक बेपत्ता होते. एकाच कुटुंबातील तिघांचा कार नदीत कोसळून बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण सांगे हादरून गेले असून अशा प्रकारची सांगेत घडलेली ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे.
कन्या न आल्याने बचावली
मिलिंद हे काकोडा येथे राहत होते. त्यांचे मूळ घर कुयनामळ-मारंगण येथे असून ते आपली पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा यांच्यासमवेत कुयनामळ घरी आले होते. सोमवारी सायंकाळी गाडीत नारळ टाकून ते काकोडा येथील घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची निळ्या रंगाची झेन कार सांगेच्या दिशेने येत असताना तारीपांटो पुलाजवळून थेट नदीत कोसळली. मिलिंद यांची कन्या त्यांच्याबरोबर आली नव्हती. त्यामुळे ती बचावली, अशी माहिती मिळाली. सोमवारी रात्री तिनेच दोन्ही मृतदेहांची ओळख पटविली.
… तर दुर्घटना टळली असती
तारीपांटो येथील हा पूल सुमारे साठ वर्षांपूर्वीचा असून तो खूप अऊंद आहे. ज्या भागातून थेट कार नदीत कोसळली तेथे पुलाच्या बाजूने संरक्षक भिंत उभारलेली नाही. तसेच खाली दरी आहे. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट नदीत कोसळली. कारची देखील बरीच हानी झाली असल्याचे कार नदीतून वर काढल्यानंतर जाणवून आले. सुमारे दोन तास कार नदीच्या पाण्याखाली राहिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य हाती घेऊन सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने पाण्यात पडलेली कार वर काढली होती आणि दोन मृतदेह सापडले होते. अग्निशामक दलाच्या आणि आपत्कालीन सेवेच्या जवानानी यावेळी शोधकार्यात पूर्णपणे झोकून दिले होते. गावच्या लोकांनी आणि पोलिसांनाही त्यांना मदत केली. पुलाच्या बाजूने संरक्षक भिंत असती, तर ही दुर्घटना घडली नसती, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.