वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावला आहे. रांचीमधील जमीन घोटाळ्याप्रकरणी आता त्यांची 9 सप्टेंबर रोज चौकशी होणार आहे. सोरेन यांना यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा दर दुसऱ्यांदा 24 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. तर सोरेन यांनी ईडीच्या अधिकारक्षेत्राला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे पत्राद्वारे कळविले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतरच कुठलेही पाऊल उचलणार असल्याचे सोरेन यांनी म्हटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी अद्याप झालेली नाही तसेच ईडीला न्यायालयाकडून कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही.
ईडीने देखील सोरेन यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. तिसऱ्या समन्सनंतरही सोरेन चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यास ईडीकडून आणखी समन्स बजावले जाऊ शकतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ईडी न्यायालयात धाव घेऊ शकते. मुख्यमंत्री चौकशीत सहकार्य करत नसल्याची भूमिका ईडीकडून न्यायालयात मांडली जाऊ शकते. मग न्यायालयाकडून जामिनपात्र वॉरंट बजावले जाऊ शकते. तरीही सोरेन चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यास अजामिनपात्र वॉरंट जारी केले जाण्याची शक्यता आहे.