ऑनलाईन टीम/तरुण भारत
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) या चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रियांशू क्षत्रिय (वय १८) (Priyanshu Kshatriya) असं चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्याचं नाव आहे. प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दरम्यान, प्रियांशू यानं नागपूरमधील मनकापूर भागातील प्रदीप मोंडावे यांच्या घरातील दागिने, मोबाइल व रोख रक्कम चोरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. प्रदीप मोंडावे यांनी प्रियांशूच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रियांशूनं आपल्या घरातून ५ लाख रुपये किंमतीचे दागिने व रोकड चोरल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. त्या आधारे पोलिसांनी प्रियांशूला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रियांशुने चोरी केल्यानंतर या वस्तू नागपुरातील गड्डीगोदाम परिसरातील एका कबुतराच्या पेटीत ठेवल्या होत्या. दरम्यान, झोपडपट्टी परिसरातील मुलांना व्यसनांपासून व गुन्ह्यांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विजय बारसे या माजी शिक्षकाच्या जीवनावर आधारित ‘झुंड’ सिनेमा नुकताच आला होता. अमिताभ बच्चन यांची त्यात प्रमुख भूमिका होती. प्रियांशू यानं या चित्रपटात बाबू छेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट समीक्षकांनी गौरवला होता. प्रियांशूच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती. याआधी चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाही चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. आता पुन्हा त्याला त्याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.