अध्याय अठ्ठाविसावा
अध्यायाला सुरवात करताना नाथ महाराज त्यांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्याविषयी अत्यंत विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, आधीच श्रीभागवत अगम्य त्यात पुन्हा एकादश स्कंध समजायला आणखीनच कठीण परंतु बाप, समर्थ, कृपाळू असलेल्या सद्गुरुंनी माझ्याकडून मराठीत तो वदवून घेतला. आई ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील लोणी काढून आयतेच बाळाच्या हातात ठेवते त्याप्रमाणे जनार्दन महाराजांनी एकादश स्कंधाचे मराठीतील विवेचन माझ्या हातावर ठेवले आहे. व्यासमुनींनी स्वत: वेद्शास्त्राचे मंथन करून श्री भागवताची निर्मिती केली. त्या भगवताचा मतितार्थ म्हणजे हा एकादश स्कंध होय. कारण भागवतात जे जे तत्वज्ञान गोष्टीरूपाने सांगितले आहे ते ते सर्व ह्या एकादश स्कंधात एकत्रितपणे दिले आहे. अर्थातच त्या एकादश स्कंधाची थोरवी जाणण्यासाठी मी सर्वार्थाने असमर्थ आहे पण श्री जनार्दन महाराजांनी त्याचे मंथन करून त्याचा सारांश अलगद माझ्या हातात ठेवला आहे. तो मी जसजसा कथन करत आहे तसतशी मला त्याची गोडी जाणवू लागली आहे. त्यामुळे एकादश स्कंधावर मी लिहित असलेली टीका उत्तरोतर बहरत चाललेली आहे. म्हणून सांगतो की मी माझ्या बुद्धीने एकटाच ही टीका करत नसून श्री जनार्दन स्वामींचाही त्यात सहभाग आहे. किंबहुना असंही म्हणता येईल की ते सांगतायत ते मी केवळ उतरवून काढतो आहे. ज्याप्रमाणे जेवणामध्ये गोड पदार्थ सर्वांना प्रिय असतो त्याप्रमाणे भागवतातील एकादश स्कंध हा भागवतातील गोड पदार्थातील माधुर्यासारखा आहे. त्यातही पुन्हा यातील अठ्ठाविसावा अध्याय अतिसुरस आहे. देहामध्ये डोक्याला सर्वात महत्त्व असते. त्याप्रमाणे अठ्ठाविसाव्या अध्यायाचे निरुपण संपूर्ण एकादश स्कंधात महत्त्वाचे आहे. तो सोलीव स्वानंदाचा झरा आहे असे म्हंटले तरी चालेल. हा अठ्ठाविसावा अध्याय ब्रह्मसुखाची प्रचीती आणून देणारा असल्याने तो भगवंताना अत्यंत प्रिय आहे. म्हणून उद्धवाने काही प्रश्न किंवा शंका न विचारताच भगवंत स्वत:हून त्याचे निरुपण करत आहेत. भगवंतानी आपणहून निरुपण करण्यामागे एक विशिष्ट कारण आहे तेही आता सांगतो. ऊद्धव भगवंतांच्या मुखातून आत्मज्ञान ऐकून ज्ञानसंपन्न झाला होता. अर्थातच ज्ञानसंपन्न झाल्यामुळे त्याला त्या ज्ञानाचा आत्यंतिक अभिमान होऊ नये, सर्व जग मूर्ख असून मीच काय तो एकटा शहाणा असा अहंकार त्याला होऊ नये ह्या काळजीपोटी भगवंत उद्धवाचा कळवळा येऊन पुढील निरुपण करत आहेत. ह्यात मुख्यत्वेकरून गुणदोषांची कथा भगवंत सांगत आहेत. त्यामागचे कारण असे की, जेथे गुणदोषांची चर्चा चालू असते तेथे ज्ञान पूर्णपणे मावळून जाते. एव्हढेच नव्हे तर मिळवलेल्या ज्ञानाचा अभिमान मात्र जोर करतो आणि तोच साधकाला बाधक ठरतो. अभिमानाबद्दल काय सांगावं त्याने प्रत्यक्ष सदाशिवाला जीवभावाला आणलं तिथं सामान्य मनुष्याचा पाड कितीसा लागणार? आणि अहंकारी जीवाची मुक्तता तरी कशी होणार? गुणदोषांची चर्चा जेथे ईश्वरच करू लागला तर इतरांना काय दोष लावणार? हे सर्व लक्षात घेऊन उद्धवाच्या स्वार्थासाठी भगवंताना कळवळा येऊन ते हे निरुपण करत आहेत. बाळाच्या हितासाठी त्याची आई सदोदित झटत असते तसाच हा प्रकार होय. अभिमान हा नेहमीच चोर पावलाने मनात शिरत असतो. त्यामुळे हे ज्ञानाभिमानाचे बाधकपण साधकांच्या बिलकुल लक्षात येत नाही. तसे उद्धवाचे होऊ नये म्हणून स्वत:हून भगवंत हे निरुपण करत आहेत. हे समजल्याशिवाय पूर्ण ब्रह्मज्ञान होत नाही. उद्धवाला तर भगवंताना पूर्ण ब्रह्मज्ञान करून द्यायचे आहे कारण उद्धवाचा जन्म यादव वंशात झालेला असल्याने आणि यादव कुळाचा शापामुळे निर्वंश होणार असल्याने त्यापासून उद्धवाचा बचाव करावा म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मज्ञान भगवंत सांगत आहेत कारण ज्याला ब्रह्मज्ञान झाले असेल त्याला शापबंधन बाधू शकत नाही.
क्रमश: