पुणे / प्रतिनिधी :
एल निनोचा प्रभाव, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव, मेडन ज्यूलीयन ओसियनची तीव्रता तसेच तटस्थ इंडियन ओशय डायपोलमुळे यंदाचा ऑगस्ट महिना 1901 नंतरचा दुष्काळी महिना ठरला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सध्या तरी परतीच्या मान्सूनची काही चिन्हे दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. मोहोपात्रा यांनी ऑगस्ट महिन्याचा आढावा तसेच सप्टेंबर महिन्याचा पावसाचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑगस्ट महिन्यात प्रशांत महासागरात मेडन ज्यूलीयन ओसियनची तीव्रता अधिक होती. याबराबरोबच या महिन्यात कमी दाबाची क्षेत्रेही कमी निर्माण झाली. यामुळे देशभरात केवळ 9 दिवस पाऊस झाला, त्यातही पूर्व, पूर्वोत्तर भारतात या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाची ओढ जाणवली. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड हा 20 दिवस राहिला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट ही सरासरीच्या उणे 36 टक्के नोंदविण्यात आली. या महिन्यात 161.7 मिमी एवढा पाऊस देशभरात नोंदविण्यात आला. यापूर्वी 1901 अशी स्थिती उद्भवली होती. त्यामुळे यंदाचा ऑगस्ट महिना पावसाच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरला आहे.
दक्षिण भारत, मध्य भारतात तूट अधिक
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऑगस्ट महिन्यात केवळ पूर्व, लगतचा पूर्वोत्तर भारत, मध्य भारताच्या काही भागात पाऊस चांगला झाला. मात्र, इतर विभागात पावसाची तूट राहिली. त्यात दक्षिणकडे ऑगस्ट महिन्यात उणे 60, मध्य भारतात उणे 47, वायव्य भारतात उणे 37 इतका कमी पाऊस झाला आहे, तर केवळ पूर्व व पूर्वोत्तर भारतात पाऊस चांगला राहिला असून, येथे सरासरीच्या 2 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. दक्षिण तसेच मध्य भारतातही ऑगस्ट महिन्यात 1901 नंतर सर्वात कमी पावसाचा रेकॉर्ड झाला आहे.
एल निनोचा प्रभाव 2024 च्या सुरुवातीपर्यंत
सध्या प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती तटस्थ आहे. मात्र, आता याचा प्रभाव आता वाढणार असून, यावर्षीची थंडी तसेच 2024 च्या सुरुवातीपर्यंत तो राहणार आहे. सध्या इंडियन ओशन डायपोल तटस्थ असला तरी येथून पुढे तो पॉझिटिव्ह स्थितीत येणार आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याचे डॉ. मोहोपात्रा यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस
सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीइतका राहण्याची चिन्हे आहेत. सरासरीच्या 91 ते 109 टक्क्यांदरम्यान हा पाऊस राहील. हिमालयाचा पायथा, पूर्व भारत, पूर्व मध्य भारत, दक्षिण भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस या महिन्यात राहील, तर उर्वरित भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रात पाऊस कमी
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस या महिन्यात राहणार आहे. याबरोबरच सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवडय़ात पाऊस दमदार राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, कर्नाटक किनारपट्टी, गोवा, दक्षिण कर्नाटक, केरळ, दक्षिण तामिळनाडू, पंजाब, हरियाणा तसेच काश्मीरचा काही भाग, दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांत पाऊस कमी राहणार आहे.
2 सप्टेंबरपासून पाऊस वाढणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणार असून, याच्या प्रभावामुळे पूर्व भारत, दक्षिण भारत तसेच मध्य भारतात पाऊस चांगला पाऊस होणार असून, मान्सून सक्रिय होणार आहे.
परतीच्या मान्सूनचे अद्याप संकेत नाही
सर्वसाधारणपणे 14 सप्टेंबरनंतर राजस्थानपासून परतीचा मान्सून सुरु होतो. 2 सप्टेंबरनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. याच्या प्रभावामुळे राजस्थानसह वायव्य भारतात दमदार पाऊस होणार आहे. मध्य भारतातही यामुळे पाऊस राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मान्सूनची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत, असे स्पष्टीकरण डॉ. मोहोपात्रा यांनी दिले.
पाऊस सर्वसाधारणपेक्षा कमी, पण अवर्षण नाहीच
एल निनोचा प्रभाव तसेच ऑगस्ट महिन्याचा पाऊस कमी झाला असला तरी संपूर्ण मान्सूनचा हंगाम सर्वसाधारण राहणार आहे. सर्वसाधारणपेक्षा किंचिंत पाऊस कमी राहू शकतो. परंतु यंदा अवर्षणाची स्थिती मात्र राहणार नसल्याचे मोहोपात्रा यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाची आकडेवारी
2005 – 191.2 मिमी
1965 – 192.3
1920 – 192.7
2009 – 193.5