प्रांताधिकाऱ्यांचे दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन : आश्वासनानंतर आंदोलन मागे
खानापूर : तालुक्यातील प्रभूनगर येथील 80 कुटुंबांवर अन्याय झाल्याच्या विरोधात त्या कुटुंबीयांनी खानापूर तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आपली मागणी ठेवली. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने पोलिसांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रांताधिकारी बाळाराम चव्हाण यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन येत्या दोन दिवसात याबाबत सखोल चौकशी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील निट्टूर ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या प्रभूनगर येथे हिडकल डॅम योजनेच्या विस्थापितांचे प्रभूनगर येथे पुनर्वसन करण्यात आले होते. यावेळी सरकारने जागा मंजूर केली होती. या जागेत 80 कुटुंबीयांनी आपली घरे बांधून वसाहत केली आहे. या ठिकाणी रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येतो.
2017 नंतर जागेची विक्री झाल्याचा आरोप
यापूर्वी ग्राम पंचायतीतून उतारेही देण्यात येत होते. मात्र 2017 नंतर घरांचे उतारे निट्टूर पंचायतीतून देण्यास नकार देण्यात येत आहे. जेंव्हा विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी सदरची जागा सरकारी पड म्हणून महसूल खात्यात नोंद होती. त्यानंतर विस्थापितांनी मंजूर झालेल्या जागेत आपली घरे बांधून वसाहत केली होती. मात्र 2017 नंतर या जागेची विक्री झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जागेचे-घराचे उतारे देणे बंद : चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी
त्यामुळे जागेचे व घरांचे उतारे निट्टूर पंचायतीने देणे बंद केले आहे. याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, तसेच आम्हाला उतारे देवून सर्व शासकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य दलित संघाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. आणि पुढील दोन दिवसात आपण प्रभूनगर येथे प्रत्यक्ष भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत निश्चित क्रम घेऊ, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात कर्नाटक राज्य दलित संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र चलवादी, उपाध्यक्ष रघुवीर तळवार, चिदानंद तळवार, पराप्पा हरिजन, तानाप्पा तळवार, राजशेखर हत्तरगी यांच्यासह इतर कुटुंबीय सहभागी झाले होते.