‘खजिन्या’चा पर्वत पाहून संशोधक दंग
इराकमध्ये संशोधकांनी उत्खननाद्वारे 4500 वर्षे जुन्या मंदिराचा शोध लावला आहे. प्राचीन सुमेरियन शहर गिरसू येथील उत्खननात हे मंदिर आढळून आले आहे. या मंदिरात अनेक प्राचीन गोष्टीही मिळाल्या आहेत. हे मंदिर मेसापोटामियाचा देवता निंगिरसुचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दीर्घकाळापासून अज्ञात हे मंदिर विटांनी तयार करण्यात आले होते, जे प्राचीन शहर गिरसूच्या केंद्रस्थानी होते. आता या पुरातत्व स्थळाला टेल्लो नावाने ओळखले जाते. सुमेरियन ही जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक होती. या संस्कृतीदरम्यान धर्म आणि कायद्याची एक संहिता स्थापन करण्यात आल्याचे मानले जाते.
हे मंदिर इराकमध्ये ब्रिटिश म्युझियमच्या संशोधकांकडून शोधण्यात आले आहे. अद्याप उत्खनन सुरू असल्याचे ब्रिटिश संशोधकांचे सांगणे आहे. हे मंदिर शहराच्या मुख्य देवतेला समर्पित होते असे ब्रिटिश म्युझियममधील प्राचीन मेसोपोटामियाचे क्यूरेटर सेबेस्टियन रे यांनी सांगितले आहे.
गिरसू हे मेसोपोटामियाचे सांस्कृतिक केंद्र होते. गिरसू जगातील सर्वात महत्त्वपूर्ण वारसास्थळांपैकी एक असून त्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. पुरातत्व तज्ञांनी वाळू आणि त्या खाली गाडले गेलेल्या गोष्टी शोधून काढण्यासाठी रिमोट सेंसिंस तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
प्राचीन शहर सर्वप्रथम 140 वर्षांपूर्वी शोधण्यात आले होते, परंतु हे स्थळ लूट आणि अवैध उत्खनन करणाऱयांच्या निशाण्यावर राहिले आहे. तर आता गिरसू येथील उत्खननाला ब्रिटिश म्युझियम आणि गेटी म्युझियमकडून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. इराकमध्ये ब्रिटिश पुरातात्विक उत्खननातून मेसोपोटामियाच्या महत्त्वपूर्ण प्राचीन युगांचा खुलासा होणार आहे. दोन्ही देशांमधील संयुक्त सहकार्याचा हा खरा पुरावा ठरणार असल्याचे इराकचे संस्कृतीमंत्री अहमद फकाक अल-बद्रानी यांनी म्हटले आहे.
महाल आणि अन्य गोष्टींच्या शोधासोबत सुमेरियन देवता निनिर्सुला समर्पित मुख्य मंदिराचीही ओळख पटविण्यात आली आहे. संबधित स्थळी 200 हून अधिक क्यूनिफार्म लेखांचा शोध लागला असून यात प्राचीन शहरातील प्रशासकीय नोंदी नमूद आहेत.