कळंगूट येथे टायरॉन नाझारेथ खूनप्रकरण
म्हापसा : कळंगूट मासळी मार्केटमध्ये 2017 साली झालेल्या टायरॉन नाझारेथ खूनप्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश कश्मा जोशी यांनी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोसेफ सिक्वेरा, केओन फर्नांडिस व महेश रामपाल अशी या तिघांची नावे आहेत. म्हापसाचे पोलिस उपअधीक्षक तथा त्यावेळचे कळंगूट पोलिसस्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी या खूनप्रकरणाचा तपास केला होता. याबाबतची माहिती अशी की, 24 जून 2017 रोजी मध्यरात्री टायरॉन नाझारेथ यांच्यावर या तिघांनी चाकू, कोयता आदीचा वापर करुन हल्ला केला होता. हल्ल्यात टायरॉन गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल केले असता तेथील ड्युटीवरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. पोलिसांनी पळून जाणाऱ्या तिघाही संशयित आरोपींना मोले चेकपोस्टवर जेरबंद करण्यात यश मिळविले होते.
पोलिसांनी या प्रकरणी 19 जणांच्या जबान्या नोंद करुन घेतल्या होत्या. सरकारी वकील म्हणून फ्रान्सिस नरोन्हा, सुनिता नागवेकर, अनुराधा तळावलीकर, रॉय डिसोझा यांनी काम पाहिले. न्यायाधीश कश्मा जोशी यांनी शिक्षा देताना आपल्या आदेशात म्हटले आहे की, खून करणारे तिघेही 22 वयोगटातील आहेत. त्यांनी युवा वयात हे खुनाचे कृत्य केलेले आहे, मात्र गुन्हेगाराला शिक्षा न देता सोडता येत नाही. युवापिढीने गुन्हेगारीपासून दूर राहावे, यासाठी शिक्षा होणे गरजेचे आहे. तत्कालीन कळंगूट पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मालवणकर, हवालदार विद्यानंद आमोणकर व कर्मचाऱ्यांनी योग्यरित्या तपास करुन संशयित आरोपींना अटक करुन योग्य शिक्षा देण्यापर्यंत यशस्वी कामगिरी बजावली होती.