शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची घोषणा : संभाव्य वेळापत्रकही प्रसिद्ध : अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्षी पुन्हा दोन संधी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने दहावी आणि बारावी परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. पुरवणी परीक्षा ही संकल्पना काढून टाकली आहे. वर्षातून एक वार्षिक आणि एक पुरवणी परीक्षेऐवजी तीन वार्षिक परीक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे. यासंबंधीचे संभाव्य वेळापत्रकही शिक्षण खात्याने प्रसिद्ध केले आहे. ही नवी परीक्षा पद्धत यंदापासूनच म्हणजे 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून जारी केली जात आहे.
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी याविषयी माहिती दिली आहे. विधानसौध येथे शालेय शिक्षण-साक्षरता खाते आणि उच्च शिक्षण खात्यामार्फत आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. दहावी आणि बारावीसाठी वर्षात तीन वार्षिक परीक्षा घेतल्या जातील. यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांनी दहावी, बारावीसाठी वर्षातून तीन परीक्षा घेण्याची घोषणा करताच शिक्षण खात्याकडून दोन्ही इयत्तांचे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले.
सध्या दहावी आणि बारावीसाठी वर्षातून एकदा वार्षिक परीक्षा घेतली जाते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक पुरवणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरील दडपण वाढते. याचा परिणाम विद्यार्थ्यांचे अर्थपूर्ण अध्ययन, शैक्षणिक प्रगतीवर होतो. सध्या बारावी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील तर त्यांना निकाल नाकारण्याची मुभा आहे. त्याने पुरवणी परीक्षा दिल्यानंतर तेथे मिळालेले सर्व विषयांचे गुण अंतिम मानले जातात. मात्र त्या विद्यार्थ्याला दोन्ही परीक्षेतील उत्तम गुण निवडण्याचा पर्याय नाही. त्यामुळे ही पद्धत विद्यार्थीस्नेही नाही. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्याची ज्ञानार्जन क्षमता आणि शैली भिन्न असते. तीन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुकूलतेनुसार परीक्षेला बसण्याची मुभा दिली जाईल. तीन परीक्षा याचा अर्थ असा नव्हे की; विद्यार्थ्याला आपल्या इच्छेनुसार कोणतीही एक परीक्षा निवडता येईल. प्रथमच दहावी किंवा बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली वार्षिक परीक्षा देणे बंधनकारक असेल. परंतु, रिपिटर्स किंवा बहिस्थ विद्यार्थ्यांना तीन परीक्षा आपल्या इच्छेनुसार देता येतील.
गुण कसे ग्राह्या धरणार?
नव्या पद्धतीत 1, 2 आणि 3 अशा वार्षिक परीक्षा असतील. पहिली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला निकाल मान्य नसेल तर दुसरी परीक्षा देता येईल. या परीक्षेतील निकालही मान्य नसेल तर तो तिसरी परीक्षा देऊ शकेल. शिवाय तिन्ही परीक्षेतील उत्तम गुण विद्यार्थ्याचा अंतिम निकाल म्हणून ओळखला जाईल. यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीतील निवड प्रक्रियेसाठी ही पद्धत अनुकूल ठरणार आहे.
परीक्षा पद्धतीत का बदल?
सामान्यपणे वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्याविद्यार्थ्याला त्याच वर्षातील पुरवणी परीक्षा देता येते. मात्र, या परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास पुढील वर्षातील परीक्षेची वाट पहावी लागते. या दरम्यान अनेकजण पुढील शिक्षण सोडून देतात. त्यावर तोडगा म्हणून 2022-23 या शैक्षणिक वर्षात दोन पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परंतु, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षा’ असा उल्लेख केला जातो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळेच शिक्षण खात्याने वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष वाया जाऊ नये म्हणून….!
दहावी आणि बारावीचा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास वर्षातून तीन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध केली जाईल. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये. त्यामुळे वर्षातून तीन वेळा दहावी आणि बारावी परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– मधू बंगारप्पा,
शालेय शिक्षण-साक्षरता मंत्री
दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक
दहावी परीक्षा
परीक्षा 1 – 30 मार्च ते 15 एप्रिल
परीक्षा 2 – 12 जून ते 19 जून
परीक्षा 3 – 29 जुलै ते 5 ऑगस्ट
बारावी परीक्षा
परीक्षा 1 – 1 मार्च ते 25 मार्च
परीक्षा 2 – 15 मे ते 5 जून
परीक्षा 3 – 12 जुलै ते 30 जुलै