केएलईच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये जुलै महिन्यामध्ये तब्बल तीन हृदय प्रत्यारोपण करून तिघांचा जीव वाचविण्याची मोठी कामगिरी पार पडली आहे. या कर्तृत्वामुळे केएलईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
बेंगळूरमध्ये फक्त यकृताचे प्रत्यरोपण एकाच महिन्यात तीनवेळा झाले होते. मात्र बेळगावातील केएलईमध्ये एकाच महिन्यात तीनवेळा हृदय प्रत्यारोपण झाले आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. हृदय आणि इतर अवयवांचे प्रत्यारोपण करण्याची आधुनिक पद्धत आली आहे. त्याचा वापर केएलईने करून अनेकांना जीवदान दिले आहे.
केएलईमध्ये वैद्यकीय मूलभूत सुविधा, प्रशिक्षित कार्यक्षम कर्मचारीवर्ग, नेटके नियोजन, रुग्णाची अधिक काळजी घेणे यामुळे फक्त 18 दिवसांत तीन हृदय प्रत्यारोपण करण्याचे शक्मय झाल्याचे शल्य चिकित्सक डॉक्टरांनी सांगून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सध्या मुसळधार पाऊस आणि प्रचंड रहदारी यामुळे धारवाडच्या एसडीएम दवाखान्यातून हृदय आणणे एक आव्हान ठरले होते. मात्र, बेळगाव आणि हुबळी-धारवाड पोलिसांच्या सहकार्यामुळे शक्मय झाले.
खानापूर तालुक्मयातील आमटे गावचे सहदेव गावकर, बेळगावचे सुभाषनगर येथील सुनील उदय सावंत आणि धारवाडच्या 16 वषीय मुलीचे हृदय प्रत्यारोपणासाठी मिळाले. हे हृदय गोकाक, कोल्हापूर आणि राणेबेन्नूर येथील रुग्णांना देऊन त्यांना जीवदान दिले गेले आहे. या रुग्णांना लवकरच घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी दिली.
हृदय प्रत्यारोपण करणाऱया टीममधील डॉ. मोहन गान, किरण कुरकुरे, दर्शन, अभिषेक प्रभू, पार्श्वनाथ पाटील, भूलतज्ञ शरणगौडा पाटील, आनंद वग्राळी, अजित शितोळे, जब्बार, श्वेता यासह इतर कर्मचाऱयांचे सहकार्य लाभले.