दिवाडीतील पती-पत्नी, उंडिरच्या युवकाचा समावेश : बेदरकार मर्सिडीज कारमुळे सात वाहनांत अपघात,स्थानिक ग्रामस्थांमुळे उधळला ‘हिट अँड रन’ चा डाव,रात्री उशिरा ग्रामस्थांचा पोलिसस्थानकावर मोर्चा
फोंडा : फोंडा-पणजी महामार्गावरील बाणस्तारी येथील पुलावर काल रविवारी रात्री सहा वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दिवाडी व उंडिर येथील मिळून तिघेजण ठार झाले असून अन्य सहाजण जखमी झाले आहेत. म्हार्दोळ पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आणि पंचनामाही केला, परंतु मृतांमधील तिघांचीही ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. शेवटी मृतांपैकी दोघेजण दिवाडी बेटावरील व एक उंडिर बांदिवडे येथील असल्याची माहिती मिळाली. म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मोटरसायकलवरील सुरेश फडते (58) व त्यांची पत्नी भावना फडते (52) ही दोघेही दिवाडी येथील असल्याचे उशिरा स्पष्ट झाले. तिसरा मयत अनुप कर्माकर (26) हा उंडिर बांदिवडे येथील आहे. रात्र असल्यामुळे अंधारात काहीच अंदाज लागत नव्हता. अपघातानंतर काहीवेळाने दोघे ठार झाल्याचा अंदाज आला आणि काहीवेळाने मृतदेहही सापडले. मात्र तिसऱ्याचा मृत्यू झालाय हे नंतर लक्षात आले. तो मृतदेह खोल दरीत पडल्याने बाहेर काढणे खूप अवघड बनले होते.
मर्सिडीज कार ठरली कारणीभूत?
अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. मात्र काही प्रत्यक्षदर्शी असलेल्यांनी पोलिस तसेच पत्रकारांसमोर बोलताना सांगितले की जीए 07 – के – 7311 ही मर्सिडीज कार अतिवेगाने असल्यामुळे हा अपघात घडला. अतिवेगात असलेली ही कार शेवटी पुलाच्या कठड्यावर स्थिरावली. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला. मर्सिडीज कार, दोन अल्टो कार, एक स्विफ्ट कार आणि दोन दुचाकी यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातामध्ये दुचाकींवरील तिघांना प्राणास मुकावे लागल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त बनले होते. म्हादोंळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मर्सिडीज कारगाडी व दुचाकीच्या धडकेनंतर सर्व थरारनाट्या घडले. मर्सिडीज कारगाडी, अल्टो, दुचाकी इतर वाहनांचा समावेश होता. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी अपघातस्थळी होते. मर्सिडीजच्या मालकाला अपघातस्थळी आणावे, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. दरम्यान सर्व जखमींना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे.