कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने, रोकड लांबविली
बेळगाव : श्रीनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून तीन लाखाचा ऐवज लांबविण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर श्रीविसर्जन मिरवणूक सुरू असताना ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. श्रीनगर येथील नागराज अप्पासाहेब देसाई यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी श्री विसर्जन मिरवणुकीत मुहूर्त साधला आहे. नागराज व त्यांचे कुटुंबीय आपल्या घराला कुलूप लावून मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. गुरुवारी मध्यरात्री 12.30 ते 3.15 यावेळेत चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. बेडऊममधील कपाट फोडून दोन नेकलेस, कर्णफुले, चेन असे 2 लाख 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोकड पळविली आहे. पहाटे कुटुंबीय घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप घातला असला तरी मिरवणूक बघण्यासाठी न गेलेल्या महिला एका बेडरूममध्ये झोपल्या होत्या. मात्र, हा प्रकार त्यांच्याही लक्षात आला नाही. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.