वृत्तसंस्था /नवी दिल्ली
व्होडाफोन आयडियावर 2.09 लाख कोटींचे कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी कंपनीने अतिरीक्त वेळ मागितली आहे. कर्जबाजारी दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन आयडियाने सध्याची थकबाकी भरण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत वेळ मागितला आहे. डिसेंबरपर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी बँका आणि गुंतवणूकदारांकडून निधी जमवला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवर्तक व्होडाफोन आयडियाला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. दूरसंचार विभागाच्या कारणे दाखवा सूचनेला उत्तर देताना, व्होडाफोन आयडियाने निधी उभारण्यात विलंब झाल्याचे कारण सांगत आम्ही त्यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. आलेली आव्हाने पार करत योग्य त्या उपाययोजना आखण्याची तयारी कंपनी करते आहे.
वेळ मागितला
28 जुलै रोजी, मोबाइल सेवा प्रदात्यांनी मार्च तिमाही आर्थिक वर्ष 2023 आणि जून तिमाही आर्थिक वर्ष 24 साठी अनुक्रमे शिल्लक 50 टक्के आणि 90 टक्के परवाना शुल्क भरण्यासाठी डिसेंबर तिमाहीपर्यंत वेळ वाढवण्याची विनंती केली. कंपनीच्या आकडेवारीनुसार, मार्च तिमाहीत बँका आणि वित्तीय संस्थांवरील कर्ज 11,390 कोटी रुपये होते. त्यापैकी 8,380.4 कोटी रुपये 31 मार्च 2024 पर्यंत भरायचे आहेत.