विनावैधतेच्या साखर सॅचेटमधून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
प्रतिनिधी / पणजी
शरिरात आधीच जास्त ’साखर’ (मधुमेह) असल्यामुळे ती जपून खाणाऱ्यांसाठी आता एक नवीनच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने या साखरेतील सारखेपणा तपासण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात काही पुरावेही सापडले असून हे प्रकार वेळीच बंद न केल्यास मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांच्या बेजबाबदारपणाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
चहा आणि कॉफी ही दोन्ही पेये आज प्रत्येकाच्याच जीवनाचे अविभाज्य घटक बनली आहेत. या दोन्हीसाठी ’साखर’ हा समान व महत्वाचा घटक. पूर्वी जेव्हा मधुमेहाचे प्रमाण जवळजवळ नगण्य असे होते तेव्हा लोक बिनधास्त साखर खायचे. नंतरच्या काळात लोकांना विविध प्रकारचे आजार जडू लागले. त्यात मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याबद्दल लोक बरेच जागरूक, दक्ष बनले. त्यातून अनेकांनी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने बिनासाखरेच्या चहाला पसंती दिली.
अशा लोकांचे हे वाढते प्रमाण लक्षात घेत अनेक कंपन्यांनी नामी शक्कल लढवत ’पॅकेटबंद रिफाईन्ड साखर’ उत्पादन सुरू केले. मोठमोठ्या तारांकित ह़ॉटेलात आज हीच साखर ग्राहकांना देण्यात येते. काही कंपन्यांनी त्याही पुढे जाताना चक्क ’साखर नसलेली साखर’ही (शुगर फ्री नेचरल) उत्पादित केली. अन्य काही कंपन्यांनी पावडर स्वऊपातील ’गुळ’ही तयार केले. अशी विविध प्रकारची सॅचेटस् आज सर्वच तारांकित हॉटेलमधून प्रत्येक टेबलवर ठेवलेली दिसून येतात.
त्यानुसार ग्राहक स्वत:ची आवड आणि गरजेनुसार त्या सॅचेटस्चा वापर करतात. परंतु असे एखादे सॅचेट फोडून चहाच्या कपात ओतताना त्याची उत्पादन तिथी वा वैधता (एक्स्पायरी डेट) तपासण्याची तसदी सुद्धा कुणीच घेत नाहीत, असेच दिसून आले आहे. आज कोणत्याही तारांकित हॉटेलात साध्या चहाची किंमत किमान 80 ऊपये आहे. त्यामुळे एवढी महाग चहा पिणाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीने थोडी तरी जागऊकता राखताना सदर साखरेचा सारखेपणा तपासण्याची गरज असते. अन्यथा तेच सॅचेट एखाद्यासाठी ’विकतचे विष’ ठरू शकते.
राजधानीतील एका पंचतारांकित हॉटेलात एका ग्राहकास मिळालेल्या या विनावैधतेच्या साखर सॅचेटवरून हे सिद्ध झाले आहे. सदर सॅचेटवर एकतर वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही तिथी नोंद नव्हत्या, त्याशिवाय तेच सॅचेट कोणत्यातरी विचित्र पदार्थामुळे मळकटलेले होते. त्यामुळे त्या ग्राहकाचा संशय बळावला. आपल्या संशयाची खातरजमा करण्यासाठी त्याने तेथील ’साखर नसलेल्या साखरेचे’ सॅचेट उचलून तपासून पाहिले. मात्र त्यावर सदर दोन्ही तिथी स्पष्टपणे लिहिलेल्या दिसून आल्या. त्याच ग्राहकाने दोन्ही सॅचेटस् आमच्यापर्यंत पोहोचविली असून, चहा शौकिनांनी सावधतेने साखर खावी, असे आवाहन केले आहे.