पंतप्रधान मोदी दाखविणार हिरवा झेंडा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, 24 सप्टेंबर रोजी देशात 9 नवीन वंदे भारत ट्रेन लॉन्च करणार आहेत. पंतप्रधान या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. देशाला एकाच वेळी 9 वंदे भारत ट्रेनची भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गाड्या सुरू झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक गाड्यांचा लाभ मिळणार आहे. या राज्यांमध्ये ओडिशा, केरळ, राजस्थान, गुजरात, तेलंगणा या राज्यांची नावे समाविष्ट आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील हावडा आणि तामिळनाडूमधील चेन्नईला प्रत्येकी दोन ट्रेन मिळणार आहेत.
वंदे भारत ट्रेनचा पहिला मार्ग तिऊनेलवेली-चेन्नई मार्ग आहे. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. दुसरी ट्रेन राउरकेला-पुरी दरम्यान चालवली जाईल. ही ट्रेन 505 किलोमीटरचे अंतर 7 तास 45 मिनिटांत पूर्ण करेल. तिसरा मार्ग हैदराबाद-बेंगळूर दरम्यान असून ती 610 किलोमीटरचा प्रवास 8 तास 50 मिनिटात पूर्ण करेल. चौथा मार्ग चेन्नई आणि विजयवाडा दरम्यान असून ही ट्रेन 6.40 तासात प्रवास पूर्ण करेल. पाचवा मार्ग रांची आणि हावडा दरम्यान असून 6.30 तासात 535 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार आहे. सहावी वंदे भारत एक्स्प्रेस पाटणा-हावडा दरम्यान धावणार असून ती 530 किलोमीटरचा प्रवास 6.30 तासात पूर्ण करेल. राजस्थानला सहाव्या ट्रेनची भेट मिळणार असून ती ट्रेन उदयपूर ते जयपूरमार्गे अजमेरला जाईल. सातवी ट्रेन कासारगोड-तिऊअनंतपुरम दरम्यान, आठवी टेन जामनगर-अहमदाबाद दरम्यान तर नववी वंदे भारत ट्रेन रांची ते हावडा दरम्यान चालवली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.