ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलमाफीचा शासन निर्णय जारी केला आहे.
मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गसह इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. या सवलतीसाठी गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ अशा आशयाचे पास वाहतूक पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हा पास परतीच्या प्रवासाकरीताही ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.