म्हापशात मंगळसूत्र चोरटय़ांच्या प्रमाणात वाढ
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरटय़ांनी आपले डोके वर काढले असून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी म्हापसा वॉशींग सेंटर जवळील रस्त्यावर दोघां अज्ञात मोटारसायकल धारकांनी खाकी पोलीस पेहराव करून आपण पोलीस अधिकारी आहे असे भासवून डांगी कॉलनी म्हापसाच्या सौ. ज्योत्सना विशाल गावस (42) यांच्या गळय़ातील मंगळसूत्र, अंगठय़ा, सोनसाखळी, बांगडय़ा आदी सोन्याचे दागिने घेऊन हातोहात पळ काढल्याची घटना दिवसाढवळय़ा घडली.
याबाबत म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान खाकी वेषात दोघे मोटारसायकलवरून आले. त्यांनी आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वाटेवरून चालत असलेल्या जोत्स्नाकडे आले व दिवसाढवळय़ा चोऱया होतात असे दागिने घालून फिरू नका. वर चोरी झालेली आहे तेथे पोलीसही आहेत असे सांगून अंगावरील दागिने पिशवीत घालण्यास सांगितले. जोत्स्नाने सर्व दागिने त्यांचे ऐकून पिशवीत घातले असता त्या पिशवीला गाठ मारण्यास सांगितले. उलट अशी गाठ मारतात काय? असा दम देऊन आपण दाखवतो असे सांगून ती दागिन्याची पिशवी हातातून हिसकावली व ती पिशवी घेऊन हातोहात दोघेही अज्ञात चोरटय़ांनी घटनास्थळावरून पळ काढला.
नंतर ज्योत्सनाने घटनास्थळी आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. म्हापसा पोलिसांनी भा.दं. संहितेच्या कलम 170, 379 अन्वे 34 द्वारे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे. दरम्यान हे इरानी गँग असावे असा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.