प्रतिनिधी/ वास्को
दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोन पर्यटक कुटुंबांना टॅक्सी व्यवसाज्यक असल्याचा बहाणा करून जवळपास 9 लाख रूपयांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पर्यटकांच्या लगेजमधून अज्ञातांनी रोख व सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. दाबोळी पोलीस संशयितांचा शोध घेण्याच्या कामाला लागले आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञातांकडून लुटले गेलेले एक कुटुंब कर्नाटकातून तर दुसरे आंध्र प्रदेशमधून गोव्यात आले होते. या दोन्ही कुटुंबांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र, ही कुटुंबे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बेंगळूर व हैद्रबादहून दाबोळी विमानतळावर उतरली होती. पर्यटनासाठी ती गोव्यात आली होती. या पर्यटकांना एकाच पध्दतीने लुटण्यात आले आहे. विशेष म्हणजे लुटल्या गेलेल्या या पर्यटकांना आपला लाखोंचा ऐवज कोणीतरी लंपास केल्याचे उशिरा कळले. लुटले गेल्याचे उमगल्यानंतर त्यांनी दाबोळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी रविवारी रात्री अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद केला.
टॅक्सी व्यावसायिक असल्याचा बहाणा
जवळपास नऊ लाखांना या पर्यटक कुटुंबांना लुटण्यात आले आहे. विमानतळावरील पहिल्याच आगमन व्दाराबाहेर हा प्रकार घडला. आंध्र प्रदेशमधील बी.एन. शहा अली हे बेंगळूरहून आपल्या कुटुंबासह विमानतळावर रात्री 11 च्या सुमारास उतरले होते. याच सुमारास मुळ जम्मू काश्मीरमधील सज्जाद अहमद भट हैद्रराबादहून आपल्या कुटुंबासह दाबोळी विमानतळावर उतरले. या पर्यटक कुटुंबांना एका भामटय़ाने टॅक्सी व्यवसायिक असल्याचे भासवून त्यांची चौकशी केली. टॅक्सी भाडे दराविषयी त्यांना माहिती दिली. मात्र, पुढे त्यांचा व्यवहार काही झाला नाही. दोन्ही कुटुंबांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना आपल्या बॅग व इतर काही वस्तू गायब झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध करून ऐवज सापडत नसल्याने त्यांना त्या टॅक्सी व्यवसायिकाबाबत संशय आला. त्यामुळे रविवारी सकाळी दाबोळी विमानतळावर येऊन त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. टॅक्सी विषयी चर्चेत गुंतवून अज्ञात व्यक्तीने ट्रॉलीवरील त्यांचे सामान लंपास केल्याचा संशय आहे.
सुमारे नऊ लाखांचा ऐवज लंपास
या घटनेत शाह अली कुटुंबियांचे 70 हजारांची रोख, सात लाख रूपये किमतीचे दागिने लंपास झालेल आहे. तर सज्जाद अहमद भट कुटुंबाचे 1 लाख रूपयांची रोख व काही दागिने लंपास झाले. दोन्ही घटनांत मिळून सुमारे 9 लाख रूपये किमतीचा ऐवज लुटण्यात आलेला आहे.
पोलिसांना आता सीसीटीव्हीचाच आधार
या प्रकरणी दाबोळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक व्ही.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाबोळीतील पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकारामुळे दाबोळी विमानतळावरील टॅक्सी व्यवसायिकही धास्तवले आहेत. दाबोळी विमानतळावरील आवारात विमानतळाशी संबंधीत नसलेले अनेक टॅक्सीवालेही येत असतात. अशा घटनांबाबत विमानतळावरील अधिकृत टॅक्सी व्यवसायिकांनी यापूर्वीच पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता. विमानतळाच्या आगमन कक्षाबाहेरच अशा प्रकारे लुटण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य पसरले आहे.