वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 29 ऑगस्ट रोजी 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कारचे अनावरण करणार आहेत. कारचे तपशील सध्या उघड झाले नाहीत, परंतु मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती टोयोटाची इनोव्हा किंवा केमरी असू शकणार असल्याची माहिती आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, ‘29 ऑगस्टला मी फ्लेक्स इंधनावर आधारित टोयोटाची कार लॉन्च करणार तसेच ही कार 100 टक्के बायोइथेनॉलवर चालणारी असेल. या इंधनासह, कार हायब्रिड प्रणालीसाठी 40 टक्के वीज निर्माण करू शकणार असल्याचेही म्हटले आहे.
जगातील पहिली बीएस-6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार
‘या इंधनामुळे पेट्रोलियम आयातीवर होणारा खर्च वाचू शकतो. स्वावलंबी व्हायचे असेल तर तेलाची आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या देश यावर 16 लाख कोटी रुपये खर्च करतो, ज्याने आपल्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे, असे गडकरी म्हणाले.
इथेनॉल पेट्रोलच्या निम्मे : गडकरी
इथेनॉलची किंमत प्रति लिटर 60 रुपये आहे आणि ही कार 15 ते 20 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. हे पेट्रोलपेक्षा कितीतरी अधिक किफायतशीर बनते, जे सध्या सुमारे 120 रुपये प्रति लिटर आहे. हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई लाँच करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फ्लेक्स-इंधन वाहनावरही काम
टोयोटा व्यतिरिक्त, मारुती कंपनी ‘फ्लेक्स-इंधन’ वाहनांवरदेखील काम करत आहे. कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पोमध्ये वॅगन आर प्रोटोटाइपचे प्रदर्शन केले होते. ही कार 85 टक्के इथेनॉल मिक्स इंधनावर धावू शकते.
इथेनॉल मिसळण्याचा फायदा काय आहे?
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याचा वापर केल्यास, वाहने 35 टक्के कमी कार्बन मोनॉक्साइड उत्सर्जित करतात. इथेनॉल सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्सचे उत्सर्जन देखील कमी करते. इथेनॉलमध्ये असलेल्या 35 टक्के ऑक्सिजनमुळे, हे इंधन नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जनदेखील कमी करते.
शेतकऱ्यांना फायदा : इथेनॉलचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. कारण ऊस, कॉर्न आणि इतर अनेक पिकांपासून इथेनॉल तयार केले जाते. साखर कारखानदारांना उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
इथेनॉल म्हणजे काय?
इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते, जे पर्यावरणास अनुकूल ठरते. इथेनॉल प्रामुख्याने उसाच्या रसापासून तयार केले जाते, परंतु कॉर्न, कुजलेले बटाटे आणि कुजलेल्या भाज्या यांसारख्या स्टार्चयुक्त पदार्थांपासूनदेखील इथेनॉल तयार केले जाऊ शकते.
1 जी इथेनॉल: इथेनॉल उसाचा रस, गोड बीट, कुजलेले बटाटे, गोड ज्वारी आणि कॉर्नपासून बनवले जाते.
2 जी इथेनॉल: इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्नोसेल्युलोसिक पदार्थ जसे की तांदूळ, गव्हाची भुसी, कॉर्नकोब, बांबू आणि वृक्षाच्छादित बायोमासपासून बनवले जाते.
3 जी जैवइंधन: जैवइंधन शैवालपासून बनवले जाईल. सध्या यावर काम सुरू आहे.