उचगाव-कोवाड सूचनाफलक नसल्याने अपघातात वाढ : नागरिकांतून संताप
वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावर उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी घातलेले गतिरोधक व या ठिकाणी गतिरोधकसंबंधी कोणतेही सूचनाफलक अथवा पांढरे पट्टे नसल्याने हेच गतिरोधक वाहनचालकांच्या मृत्यूचे सापळे बनल्याने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी की, उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉसपर्यंतच्या उचगाव-कोवाड या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सदर रस्ता गुळगुळीत झाल्याने या रस्त्यावरून वाहने बेफाम धावत असून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. परिणामी सदर रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावेत, अशी मागणी या भागातील व या मार्गे ये-जा करणाऱया हजारो प्रवाशांतून केली जात होती.
वाहनवेगावर चाप आवश्यक
या मागणीनुसार उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने तीन गतिरोधक घातले. रात्रीच्या वेळी भरधाव धावणारी अनेक दुचाकीस्वार व चार चाकी वाहने रस्त्यावर घातलेल्या गतिरोधकांची माहिती नसल्याने उडून पडून मोठे अपघात या आठवडय़ाभरात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या गतिरोधकावरून ये-जा करताना वाहने व वाहनावर पाठीमागे बसलेल्या महिला पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण पडून बेशुद्ध झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. सदर गतिरोधकाच्या ठिकाणी गतिरोधक असल्याचे सूचनाफलक याबरोबरच घातलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे, चिन्हे वापरली नसल्याने मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. तरी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने या गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढून त्याचबरोबर सूचनाफलक लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.