रॉ एजंटच्या भूमिकेत तब्बू
विशाल भारद्वाज यांचा चित्रपट ‘खुफिया’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील तब्बू आणि अली फजलचा अवतार चकित करणारा असणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर असून तो एका सत्यघटनेवर आधारित आहे. चित्रपटात तब्बूने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. तर अली फजल एका देशद्रोह्याच्या भूमिकेत आहे. रॉ मध्ये राहून महत्त्वाची माहिती शत्रूला पुरविणाऱ्या हस्तकाच्या भूमिकेत अली फजल दिसून येणार आहे.
खुफिया हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तब्बू आणि अली फजलच्या अभिनयासोबत थ्रिल तसेच सस्पेन्सने चाहत्यांच्या अंगावर काटा आणला आहे.
खुफिया हा चित्रपट ‘एस्केप टू नो वेयर’ नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. ट्रेलरची सुरुवात रॉमधील दृश्याद्वारे होते. अधिकारी संभाव्य लीकबद्दल बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे. यात रॉ एजंट असणारी तब्बू एका धोकादायक मिशनवर असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. रॉमध्ये शत्रूचा हस्तक कोण याचा शोध ती घेत असते. विशाल भारद्वाजचा हा चित्रपट असल्याने याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. याचबरोबर तब्बू, वामिका अन् अली फजलसारखे दमदार कलाकार असल्याने चित्रपट निश्चितच पर्वणी ठरणार आहे.