आधी मैत्री, नंतर खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन लूट : गुन्ह्यात खासकरून बिहार, उत्तरप्रदेशमधील गुन्हेगार कार्यरत : प्रवाशांनी स्वत:च खबरदारी घेणे गरजेचे
बेळगाव : प्रवास करताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना नेहमीच देत असतात. तरीही प्रवासात खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. गेल्या सोमवारी 11 सप्टेंबर रोजी वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मध्यप्रदेशमधील आठ कामगार तरुणांना गुंगीचे औषध देऊन लुटण्यात आले. त्यानंतर रेल्वेप्रवाशांना लुटणाऱ्या ‘ड्रगिंग गँग’चे कारनामे ठळक चर्चेत आले आहेत. प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे कितीही ठरविले तरी हे भामटे खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडतातच. प्रवासादरम्यान प्रवाशांशी मैत्री करून आम्हीही तुमच्याच भागातले आहोत. त्याच भागात जात आहोत. आम्ही दोघे प्रवासातील सहकारी आहोत, असे सांगत आधी विश्वास संपादन करतात. प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर एक-दोन तासांत खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देऊन सावजाला बेशुद्ध करून त्याला लुटले जाते.
अशा प्रकारच्या गुन्ह्यात खासकरून बिहार आणि उत्तरप्रदेशमधील गुन्हेगार कार्यरत आहेत. रेल्वे जेथून सुटते, तेथूनच या कारस्थानाला प्रारंभ होतो. सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी खांडवा व टिकामनगर (मध्यप्रदेश) मधील आठ कामगार तरुण वास्कोहून आपल्या गावी जात होते. वास्कोमधून रेल्वे सुटण्याआधीच चार प्रवासी आले. मध्यप्रदेशला जाणाऱ्या आठ तरुणांना त्यांनी गाठले. आम्हीही मध्यप्रदेशला जात आहोत, असे सांगत मडगाव रेल्वेस्थानक येण्याआधी त्या आठही तरुणांना चिप्स व चॉकलेट खाण्यास दिले. चिप्स व चॉकलेट खाल्ल्यानंतर सर्व आठ जणांना गुंगी चढली. रेल्वेत त्यांना उलट्या सुरू झाल्या. काय होतेय, हे समजण्याआधीच सावर्डेजवळ चेन खेचून चारही भामट्यांनी रेल्वेतून पळ काढला. रेल्वे सुटल्यानंतर आरपीएफच्या जवानांच्या हा प्रकार लक्षात आला. नहून या तरुणांना झोपेतून जागे होण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागले असते. त्यांच्याजवळून सात मोबाईल व सुमारे 25 हजार रुपये असा लाखाचा ऐवज लांबविण्यात आला आहे. गुंगीतून शुद्धीवर यायला त्यांना किमान दोन दिवस लागले. दोघे जण तर चार दिवसांनंतर शुद्धीवर आले.
मार्च 2020 मध्ये बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात वास्कोहून प्रवास करणाऱ्या तिघा जणांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याजवळील तीन मोबाईल संच व 12 हजार रुपये रोकड पळविण्यात आली होती. रेल्वे दूधसागरजवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार लोंढ्याजवळ रेल्वेतून तिघा जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर बेळगाव परिसरात ड्रगिंगच्या घटना घडल्या नव्हत्या. तीन वर्षांनंतर पुन्हा अशी घटना घडली आहे. त्यावेळी बिहारमधील मोहम्मद मुक्तार आलम, शादाब, अन्वर आलम या तिघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर हे तिघे जण न्यायालयीन कामकाजालाही हजर राहिले नाहीत. या त्रिकुटाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याजवळून विशिष्ट प्रकारच्या झोपेच्या गोळ्या जप्त केल्या होत्या. ड्रगिंग कसे केले जाते? सावजांची लूट कशी केली जाते? याचा संपूर्ण पाढाच या त्रिकुटाने वाचला होता. उत्तरप्रदेश व बिहारमधील भामटे अधूनमधून या परिसरात ड्रगिंगसाठी फिरत असतात.
2 फेब्रुवारी 2009 रोजी यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या बेंगळूर येथील एकाच कुटुंबातील 5 ते 6 जणांना सुगंधी दुधातून गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटण्यात आले होते. बेळगावजवळ हा प्रकार उघडकीस आला होता. गोवा, उत्तर कर्नाटकात अशा अनेक घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने जागृतीची मोहीमही हाती घेतली होती. रेल्वे पोलिसांनी तर 5 ते 6 प्रबोधनात्मक व्हिडिओ तयार करून यु-ट्यूबच्या माध्यमातूनही जागृती केली होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही प्रत्येक बोगीत जाऊन सातत्याने पाहणी करीत असतात. मात्र, पोलिसांनाही संशय येऊ नये, अशा पद्धतीने भामटे हातचलाखी करतात. जणू वर्षानुवर्षाची मैत्री आहे, असे भासवून सावजाला खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध दिले जाते. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की सोमवारी उघडकीस आलेल्या घटनेत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने लवकर माहिती मिळाली. दोन ते तीन प्रवाशांवर गुंगीचा प्रयोग केल्यास त्यांना शेवटचे स्थानक आले तरी शुद्ध येत नाही. या घटनेनंतर रेल्वेत तपासणी वाढविण्यात आली असली तरी प्रवासात आपली फसवणूक होऊ नये, यासाठी स्वत:च खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
खासकरून वडापावचा वापर
प्रवासादरम्यान भामट्यांकडून दिले जाणारे खाद्यपदार्थ तोंडात टाकल्यानंतर सावजाला लगेच गुंगी कशी येते? याविषयीही तपास झाले आहेत. विशिष्ट प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. सुगंधी दूध, शीतपेये, चॉकलेट, चिप्स व खासकरून वडापावमधून ड्रगिंग केले जाते. पूर्वी जास्तीत जास्त दूध किंवा शीतपेयातून गुंगीचे औषध दिले जात होते. आता चॉकलेट व इतर खाद्यपदार्थातून दिले जात आहे. सावजाला देण्यापूर्वी चॉकलेट मधोमध कापून त्यामध्ये गुंगीचे औषध भरलेले असते. सावजाला कळू नये, अशा पद्धतीने ते पुन्हा पॅक करून त्याला खाण्यासाठी दिले जाते. तर चिप्सवर मसाल्यामध्ये मिसळून औषध टाकले जाते. सावजाला लुटण्यासाठी भामटे घोळक्याने असतात. किमान तीन ते चार जण एकत्र असतात. त्यामुळे सावजाला त्यांच्या वागण्या-बोलण्यावर लवकर विश्वास बसतो.