प्रतिनिधी /बेळगाव
क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात समस्यांचा डेंगर होता. कार्यालयीन कामकाज करणाऱया कर्मचाऱयांना दरवाजे नसलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत होता. आधीच्या शिक्षणाधिकाऱयांनी याकडे कधी लक्ष पुरविलेच नाही. परंतु नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकाऱयांनी अवघ्या सहा महिन्यांत स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून नवे रुप दिले. यामुळे कार्यालयीन कर्मचारी व कामानिमित्त येणारे शिक्षक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात रोज शेकडो शिक्षकांची ये-जा असते. तसेच 40 ते 50 कर्मचारी या कार्यालयात काम करीत आहेत. परंतु चांगले स्वच्छतागृह नसल्याने येथील कर्मचाऱयांची कुचंबना होत होती. पुरुष व महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती. निखळलेले दरवाजे, तोटी नसलेले नळ, निखळलेल्या फरशा अशी अवस्था स्वच्छतागृहांची होती.
शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी या कार्यालयाचा पद्भार स्वीकारताच सहा महिन्यांत कायापालट केला आहे. तीन-चार वर्षांपासून दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांची त्यांनी दुरुस्ती करवून घेतली. स्वच्छतागृहांचे रंगकाम करून त्यांना दरवाजे बसविण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱयांचे कौतुक होत आहे.