ऑनलाईन टीम / तरुण भारत :
समृद्धी महामार्गावर प्रवाशी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी लागल्याने पलटी झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. कारंजा शहराजवळच्या वाढोणानजिक हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एन.एल. 01 बी 2239 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स आज पहाटेच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. वाढोणानजिक चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यावरच आडवी होऊन उलटली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.