वृत्तसंस्था /ऑकलंड
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने राष्ट्रीय कराराचा प्रस्ताव नाकारूनही भारतात यंदा होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी आपण उपलब्ध असल्याचे सांगितलेले असून त्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे, असे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडील करारातून बाहेर पडलेल्या बोल्टला गुऊवारी जाहीर करण्यात आलेल्या न्यूझीलंडच्या करारबद्ध खेळाडूंच्या नवीन यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याऐवजी त्याने ‘कॅज्युअल प्लेइंग’ करारवर स्वाक्षरी केली आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले. बोल्टने तो विश्वचषकासाठी उपलब्ध असल्याचे सूचित केले आहे, असे स्टेड यांनी पत्रकारांना म्हणाले. बोल्ट हा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे दुखापती नसल्यास तो आमच्या संघाचा भाग बनण्याची भरपूर शक्यता आहे, असे स्टेड यांनी सांगितले. बोल्ट आणि टिम साउथी ही गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत भेदक वेगवान गोलंदाजांच्या जोडींपैकी एक राहिली होती. त्यांची न्यूझीलंडला 2021 मधील पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि मागील दोन मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम फेरीत मोलाची मदत केली. तथापि, बोल्टला त्याच्या विनंतीवरून गेल्या ऑगस्टमध्ये करारातून मुक्त करण्यात आले. आपल्याला कुटुंबियांसह घरी जास्त वेळ घालवायचा आहे आणि प्रवासात कमी वेळ घालवायचा आहे, असे त्याने सांगितले होते.