विजयी संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव ; सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव शहर तालुकास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत प्राथमिक गटात अंतिम सामन्यात गोमटेशने सेंट अॅथोंनी संघाचा, मुलींच्या गटात बालिका आदर्शने चव्हाट गल्ली क्लस्टरचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर माध्यमिक गटात गोमटेशने सेंटपॉल्सचा तर मुलींच्या गटात गोमटेशने न्यू गर्ल्स हायस्कूल संघाचा पराभव करून तिहेरी मुकुट पटकाविला. गोमटेश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शहर तालुकास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचे उद्घाटन गोमटेश स्कूलचे मुख्याध्यापक सुनिल पाटील व इतर मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्राथमिक गटात 8 व माध्यमिक गटात 8 संघानी भाग घेतला होता. प्राथमिक मुलांच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेशने छत्रपती क्लस्टरचा तर दुसऱ्या उपांत्यफेरीत सेंट अँथोनी संघाने महांतेशनगर क्लस्टरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत गोमटेशने सेंट अँथोनी संघाचा 25-18, 19-25, 17-15 अशा गुण फरकाने पराभव करून तर मुलींच्या अंतिम सामन्यात बालिका आदर्श संघाने मराठी विद्यानिकेतन संघाचा 25-14, 25-19 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले.
माध्यमिक गटात मुलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेशने शहापूर विभागीय संघाचा तर दुसरा उपांत्यफेरीत सेंट पॉल्सने माळमारूती विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात गोमटेशने सेंट पॉल्सचा 25-21, 25-23 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद तर मुलींच्या गटात अंतिम सामन्यात गोमटेशने सेंट अँथोनी संघाचा 15-12, 11-15, 15-10 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्याहस्ते विजेत्या गोमटेश बालिका आदर्श, उपविजेत्या सेंटपॉल्स, सेंट अँथोनी, मराठी विद्यानिकेतन संघाना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सचिन कुडची, मास्तीहोळी, उमेश मजुकर, अनिल गौडा, किरण तारळेकर, बी. जी. सोलोमन, उमेश बेळगुंदकर, सुनिता जाधव यानी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोमटेशचे क्रीडा शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.