पिंपरी / प्रतिनिधी :
अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफीच्या निर्णयाचा फक्त पिंपरी-चिंचवडला फायदा झालेला नाही. राज्यात जिथे-जिथे अवैध बांधकामांना तिप्पट दंड बसला होता. तो आता माफ झाला असल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी येथे केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या अश्विनी जगताप यांची पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी सकाळी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते बोलत होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले. शास्तीकर माफीचा एक मोठा निर्णय या अधिवेशनात शासनाने केला. त्याचा खूप लोकांना फायदा होईल. गेली अनेक दिवस हा विषय प्रलंबित होता. आचारसंहितेमुळे हा निर्णय घोषित करता येत नव्हता. आचारसंहिता ज्याक्षणी संपली. त्याचक्षणी शासन आदेश जारी करण्यात आला. या निर्णयाचा फक्त पिंपरी-चिंचवडला नव्हे तर जिथे-जिथे अवैध बांधकामांना तिप्पट दंड बसला होता. तो आता माफ झाला आहे.
अधिक वाचा : देशात बदलाचे वारे तयार होतेय..
अश्विनी जगताप या आमदार म्हणून लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळतील. त्या निवडून आल्याचे प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडून विधानसभा अध्यक्षांना मिळताच ते शपथविधीसाठी पत्र पाठवतील. ही प्रक्रिया गुरुवारपर्यंत होईल. लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवडच्या विकासाचा संकल्प घेऊन अश्विनी जगताप यांनी काम सुरू केले आहे. चिंचवडकरांनी त्यांना विजयी करून एकप्रकारे लक्ष्मण जगताप यांनाच श्रद्धांजली वाहिली आहे, अशी भावनाही चंद्रकांतदादांनी व्यक्त केली.