तालचक्र संस्थेच्या दशक महोत्सवानिमित्त कार्यकम : लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वर, ताल व नृत्याचा सुरेल त्रिवेणी संगम बेळगावच्या रसिकांना ‘तालचक्र’ या संगीत मैफलीतून अनुभवता आला. ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या अप्रतिम तबला वादनासोबत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. राम देशपांडे यांचे गायन व त्याला कथ्थक नृत्यांगना शीतल कोळवलकर यांची अदाकारी असा सुरेल संगम शनिवारी लोकमान्य रंगमंदिर येथे रसिकांना पाहता आला.
पुणे येथील पुनीत बालन ग्रुपच्यावतीने ‘तालचक्र’ या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. या मैफलीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रारंभी बेळगावचे ज्येष्ठ तबलावादक पंडित गुंडोपंत कुलकर्णी, अशोक गरगट्टी, प्रभाकर शहापूरकर, सतारवादक संजय देशपांडे, शास्त्रीय गायक मुकुंद गोरे, श्रीधर कुलकर्णी या कलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विजय घाटे व राम देशपांडे यांना उत्तम संगीत साथ मिळाली. अभिषेक शिनकर यांनी हार्मोनियम, सागर पटोकार यांनी स्वरसाथ, नोशो मोटलीकर यांनी तंबोरा साथ, निलेश यादव व प्रतिक राजकुमार यांनी ध्वनिसाथ दिली.
तालचक्र संस्था स्थापन करण्याची कल्पना दहा वर्षांपूर्वी पद्मश्री विजय घाटे यांना सुचली. या माध्यमातून पुणे येथे ते सातत्याने कार्यक्रम आयोजित करत असतात. यावर्षी संस्थेचा दशक महोत्सव असल्याने भारतातील 10 शहरात तालचक्रचे आयोजन करण्यात येत आहे. बेळगाव ही रसिकांची भूमी असल्याने आम्ही आपली कला सादर करण्यासाठी आलो आहोत. हे आयोजन करण्यात आम्हाला लोकमान्य सोसायटीचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी आमच्या कार्याला प्रोत्साहनाची थाप दिल्याचे डॉ. राम देशपांडे यांनी सांगितले.