प्रतिनिधी/ धारबांदोडा
अनमोड घाट येथे मालवाहू ट्रकच्या झालेल्या स्वयंअपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. रमेश चिलापल्ली (41, मूळ तेलांगणा) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल शनिवारी सकाळी 6.30 वा. सुमारास घडला. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश हा आपल्या आयचर मालवाहू ट्रक टीएस 12 युसी 3194 ने तेलांगणाहून ग्लास व एसीपी शिटस् घेऊन मोपा विमानतळ येथे एकटाच निघाला होता. तो स्वत: चालक मालक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनमोड घाट उतरताना दुधसागर देवस्थानजवळील उतरणीवर त्याचा वाहनावरील ताबा गेल्याने त्याची धडक रस्त्याच्या कडेला उजव्या बाजूला दगडाला धडक दिली. पाठीमागे असलेल्या काचा व शिटस् पुढे सरकल्याने तो कॅबिनमध्ये अडकला. फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्याना बाहेर काढेपर्यत तो मृत पावला होता. बांबोळी येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कुळे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत ठेवण्यात आला आहे.