एलन मस्क यांच आरोप : कॅनडाच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थन करतात. आता याचवरून जागतिक उद्योजक एलन मस्क यांनी ट्रुडो यांना घेरले आहे. जस्टिन ट्रुडो हे कॅनडात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करू पाहत असून हा प्रकार लाजिरवाणा असल्याचे मस्क यांनी सुनावले आहे. कॅनडाने अलिकडेच ऑनलाइन सेन्सरशिपवरून नवे नियम जारी केले आहेत.
नव्या नियमांनुसार सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांना सरकारकडे नोंदणी करावी लागणार आहे. अमेरिकेचे पत्रकार ग्लेन ग्रीनवॉल्ड यांच्यानुसार हे नियम अत्यंत कठोर आहेत. यामुळे सरकार ऑनलाइन कंटेंटला पूर्णपणे स्वत:च्या नियंत्रणात ठेवू शकणार आहे.
खलिस्तान समर्थकांची पाठराखण
भारत-कॅनडा वाद सुरू होण्यापूर्वी ट्रुडो हे जी-20 परिषदेत सामील होण्यासाठी भारतात आले होते. तेव्हा भारताने कॅनडासमोर खलिस्तान समर्थकांचा मुद्दा उपस्थित केला होता. कॅनडात भारतीय मुत्सद्यांच्या विरोधात हिंसा वाढत आहे, भारतीय नागरिक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत, याप्रकरणी कठोर पावले उचलली जावीत असे मोदींनी ट्रुडो यांना सांगितले होते. तर या बैठकीनंतर ट्रुडो यांनी भूमिका मांडली होती. आम्ही नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो, शांततापूर्ण निदर्शनांचा सर्वांना अधिकार असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले होते.
आपत्कालीन अधिकारांचा वापर
2020 मध्ये ट्रुडो यांनी आपत्कालीन अधिकारांचा वापर केला होता. कॅनडाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले होते. कोरोना महामारीदरम्यान ट्रकचालकांनी अनिवार्य लसीकरणाच्या विरोधात निदर्शने केली होती. तेव्हा स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कॅनडा सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर केला होता.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे नकोत
भारत आणि कॅनडा यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. भारताला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अन्य कुणाकडून धडे गिरविण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हिंसा भडकविण्यासाठी वापर होईपर्यंत बळ दिले जाऊ शकत नाही. हा प्रकार सहन केला जाणार नाही. कॅनडातील भारतीय दूतावासांवर स्मोक बॉम्ब फेकले जातात. मुत्सद्यांना धमकाविले जाते आणि त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी पोस्टर्स लावली जातात. हा प्रकार सामान्य आहे का? आता हे भारताच्या विरोधात घडत आहे, अन्य देशाच्या विरोधात हे घडले असते तर याला सामान्य घटना मानले गेले असते का? कॅनडात जे काही घडले ती क्षुल्लक घटना नसल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाला अलिकडेच सुनावले आहे.