हरित लवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांची सूचना
बेळगाव : प्लास्टिक बंदीविरोधात महापालिकेतर्फे गेल्या चार महिन्यांपासून मोहीम राबविण्यात आली. मात्र एक महिन्यापासून ही मोहीम थंडावली आहे. नुकतेच हरित लवादचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुभाष आडी बेळगावला आले होते. त्यांनी प्लास्टिकविरोधात मोहीम राबवावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम राबविण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच मोहीम राबवावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्लास्टिकमुक्त शहर करा, असे त्यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. याचबरोबर प्लास्टिकसाठी पर्यायदेखील उपलब्ध करण्यासाठी पाऊल उचला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका प्रथम प्लास्टिकसाठी पर्याय उपलब्ध करणार का? हे पहावे लागणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धाडी टाकून प्लास्टिक जप्त केले. याचबरोबर दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा फटका बसला आहे.
किराणासह इतर व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्यांशिवाय पर्याय नाही. कारण लहान जिन्नस बांधण्यासाठी प्लास्टिकचीच गरज असते. त्यामुळे जे प्लास्टिक वापरल्यानंतर खराब होते, त्या प्लास्टिकची उपलब्धता करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलणे गरजेचे आहे. मात्र केवळ कारवाई करून व्यावसायिकांना वेठीस धरू नये, अन्यथा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. अध्यक्ष सुभाष आडी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही सूचना केली आहे. त्यामुळे आता पुन्हा ही कारवाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.