नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिलेली माहिती : कामचुकारांची गय केली जाणार नाही
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेचा प्रशासकीय गाडा रूळावर आणण्यासाठी आपण काम हाती घेतले असून कामचुकारांची गय केली जाणार नसल्याचे मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मडगाव पालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱयांची यादी आपण मागवून घेतली आहे. त्यांना जे वेतन फेडण्यात येते त्यानुसार त्यांच्याकडून काम होत आहे काय याची पडताळणी करण्याचे काम मी हाती घेतले आहे. पालिका इमारत तसेच सोनसडा यार्ड, बाजारपेठा आदी ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन आपण पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी आपण गॅरेजला आकस्मिक भेट दिली असता प्रभागवार कामासाठी ट्रक आणि कामगार पुरविण्यात येतात, मात्र गॅरेजमधून ट्रक बाहेर काढण्यास विलंब लावला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण संबंधित ट्रकचालक सकाळी 8 वा. कामावर रूजू होऊन ट्रक घेऊन बाहेर न पडल्यास त्यांना सरळ घरी पाठवून गैरहजर नोंद करावले असा निर्देश ऑटोमोबाईल अभियंता रोहित गावकर यांना दिला आहे, असे नगराध्यक्षांनी नजरेस आणून दिले. याचा परिणाम म्हणून आता ट्रक वेळेत कामावर रजू होऊ लागले असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. फक्त समन्वय हवा व कामचुकारांवर कारवाईचा बडगा हवा, असे शिरोडकर यांनी सांगितले.
थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश
लेखा विभागाकडे मोठय़ा प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे तसेच निवृत्त अधिकाऱयाला वसुली अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. असे असताना थकबाकी 30 कोटींच्या घरात कशी, असा सवाल नगराध्यक्षांनीच उपस्थित केला. आपण 25 हजार व त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांकडून वसुलीसाठी आवश्यक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात आपण पाठपुरावा करून पालिकेची थकबाकी वसूल होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यापासून ऑक्ट्रॉय मिळणे बंद झाले आहे. एकल कर प्रणाली अस्तित्वात आल्याने सरकार पालिकेला ऑक्ट्रॉय देऊ शकणार नाही. मात्र अन्य योजनांच्या माध्यमातून हा महसूल पालिकेला देण्यासाठी सरकारने नियोजन करण्याची गरज नगराध्यक्षांनी व्यक्त केली.