रेल्वेतील धक्कादायक घटना ः रेल्वेमंत्र्यांची त्वरित ठोस कारवाई
वृत्तसंस्था / लखनौ
सार्वजनिक ठिकाणी अजब अन् आक्षेपार्ह कृत्य करणाऱया लोकांची संख्या वाढली आहे. कुणी विमानात प्रवाशांवर लघुशंका करत आहे तर कुणी क्षुल्लक कारणावरून भांडण करत आहे. परंतु उत्तरप्रदेशच्या लखनौमध्ये एका टीटीईने धावत्या रेल्वेत झोपलेल्या महिलेच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले आहे. या घटनेनंतर आरोपी टीटीईला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दखल घेतली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी अंबाला कँट रेल्वे विभागाचे आदेशपत्र शेअर केले असून यात आरोपी टीटीई मुन्ना कुमारवर झालेल्या बडतर्फीच्या कारवाईचा विस्तृत तपशील नमूद आहे. आरोपी टीटीईचे कृत्य महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे. त्याच्या कृत्यामुळे केवळ त्याची नव्हे तर पूर्ण रेल्वे विभागाची बदनामी झाली आहे. या गुन्हय़ाच्या शिक्षेच्या स्वरुपात मुन्ना कुमारला तत्काळ प्रभावाने पदावरून हटविले जात असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे.
अमृतसरहून कोलकाताच्या दिशेने जाणाऱया अकाल तख्त एक्स्प्रेसच्या कोच ए-1मध्ये एका महिलेवर टीटीई मुन्ना कुमारने लघुशंका केली होती. या घटनेदरम्यान महिला स्वतःच्या सीटवर झोपली होती. ती स्वतःच्या पतीसोबत प्रवास करत होती. आरोपी टीटीई मुन्ना कुमार हा मूळचा बिहारचा असून तो घटनेवेळी मद्यधुंद अवस्थेत होता. रेल्वे पोलिसांनी आरोपी टीटीईला अटक केली आहे.