इराक, कतार अन् युएईसोबत व्यापारी मार्ग विकसित करणार
वृत्तसंस्था/ अंकारा
भारत-मध्यपूर्व कॉरिडॉरमध्ये (आयएमईसी) सामील करण्यात न आल्याने तुर्किये या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाचा पर्याय शोधत आहे. कॉरिडॉरला प्रत्युत्तर देण्यासाठी तुर्किये नव्या व्यापारी मार्गाची घोषणा करू शकतो. यासंबंधी तुर्कियने इराक, कतार आणि संयुक्त अरब अमिरातसोबत बोलणी चालविली आहे.
तुर्कियेच्या कॉरिडॉरला इराक डेव्हलपमेंट रोड इनिशिएटिव्ह नाव दिले जाणार आहे. या कॉरिडॉरद्वारे इराकच्या ग्रँड फॉ बंदरापासून तुर्कियेत सहजपणे मालाची वाहतूक करता येणार आहे. या प्रकल्पावर 14 लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा व्यापारी मार्ग 1200 किलोमीटर लांबीचा असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
एकीकडे तुर्किये या प्रकल्पाकरता नियोजन करत असताना तज्ञांनी या देशाला इशारा दिला आहे. तुर्कियेकडे प्रकल्प साकार करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ नाही. पायाभूत विकासासाठी तुर्किये आता युएई आणि कतारकडून वित्तसहाय्याची अपेक्षा करत आहे. आखाती देशांकडून गुंतवणूक प्राप्त करण्यासाठी तुर्कियेला हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार असल्याचे पटवून द्यावे लागणार आहे.
इराक हा देश मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, पायाभूत विकासाला लागलेली ओहोटी, कमकुवत सरकार आणि राजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त आहे. इराक या प्रल्पाकरता किती गुंतवणूक करणार हे देखील स्पष्ट नाही. इराकमधील बसरा येथे हा प्रकल्प साकारण्याची योजना आहे, बसरा या भागात कधीकाळी इस्लामिक स्टेटचे वर्चस्व होते. अशा स्थितीत एर्दोगान यांच्या प्रकल्पाचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात सापडू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
एर्दोगान यांचे वक्तव्य
भारत-मध्यपूर्व कॉरिडॉरवर तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी आक्षेप घेत आमच्याशिवाय कुठलाच कॉरिडॉर निर्माण होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केले होते. पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने जाणाऱ्या कुठल्याही वाहतुकीला तुर्कियेतूनच जावे लागेल असे त्यांनी म्हटले होते. जी-20 परिषदेदरम्यान भारत, युएई, सौदी अरेबिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपीय महासंघातून जाणाऱ्या कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचा लाभ इस्रायल आणि जॉर्डनलाही होणार आहे.