सातारा येथील दाम्पत्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा
सातारा: खानापूर, ता. वाई येथील सोळा शेतकऱ्यांची हळद खरेदी करून त्यापोटी त्यांना सुमारे २० लाख ४ हजार ४२१ रुपये न देता त्यांची फसवणूक केल्याबद्दल येथील दौलतनगर येथे वास्तव्य करणाऱ्या एका दाम्पत्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार रमेशचंद्र सारडा, उर्मिला राजकुमार सारडा (सध्या दोघेही रा. महालक्ष्मी रेसिडेन्सी, दौलत नगर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत वाई पोलीस ठाण्यात रितेश राजाराम काळोखे रा. खानापूर, ता. वाई यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दि. ४ मार्च २०१८ साली ११.३० वाजण्याच्या सुमारास सारडा दांपत्य हे खानापूर येथे आले. त्यांनी माझ्या घराच्या शेजारील शेतात असणारी ८३ क्विंटल हळद खरेदी केली. त्याची किंमत ६ लाख ८४ हजार ७०६ रुपये तेवढी झाली होती. त्यापैकी त्यांनी १ लाख ६९ हजार ७०८ रुपये दिले. व उर्वरित ५ लाख १५ हजार रुपये थोड्या दिवसांनी देतो असे त्यांनी सांगितले. परंतु आजपर्यंत त्यांनी ते पैसे दिले नाहीत. सरडा दाम्पत्य यांनी त्याच गावातील अन्य १५ शेतकऱ्यांकडून हळद खरेदी केली असून त्यांचे १४ लाख ८९ हजार ४२१ रुपये दिलेले नाहीत. सरडा दाम्पत्यांनी एकूण २० लाख ४ हजार ४२१ रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.