या पृथ्वीवर अनेक स्थाने अशी आहेत की, जी अत्याधिक रहस्यमय असल्याची समजूत आहे. बर्म्युडा त्रिकोणाचे नाव आपण ऐकले असेलच. या स्थानी आकाशातून उडणारी विमानेही समुद्रात पडतात असे बोलले जाते. अशाच प्रकारचे एक स्थान ‘अलास्का त्रिकोण’ हे आहे. या स्थानी परग्रहावरुन आलेल्या उडत्या तबकड्या दिसतात. प्रचंड आकारची मानवी पावले दिसतात. ती परग्रहावरुन आलेल्या मानवांची असावीत असा समज आहे. पण त्याहीपेक्षा गूढ असे आहे की या स्थानी आतपर्यंत 20 हजार माणसे ‘गायब’ झाली आहेत, असे बोलले जाते. या माणसांचा मागमूसही आतापर्यंत लागलेला नाही. त्यांचे अवशेषही सापडलेले नाहीत. त्यामुळे हे स्थान बर्म्युडा त्रिकोणापेक्षाही अधिक गूढ मानले जाते.
या स्थानाची नोंद लोकप्रिय ‘डिस्कव्हरी वाहिनी’नेही घेतली आहे. या वाहिनीने एक माहितीपट या स्थानासंबंधी तयार केला आहे. त्यात उडत्या तबकड्या पाहिलेल्या लोकांची मुलाखती प्रसिद्ध केलेल्या आहेत. अत्यंत कमी उंचीवरुन अनेक विचित्र आकाराच्या उडत्या वस्तू पाहिल्याचे लोक सांगताना या मुलाखतींमध्ये दिसतात. संशोधकांनी अद्यापही याला दुजोरा दिलेला नाही. पण प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांचा विश्वास मात्र, प्रचंड प्रमाणात आहे.
अमेरिकेच्या अलास्का प्रांतात हे स्थान आहे. या स्थानापासून केवळ 11 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या मायकेल डिलन नामक व्यक्तीने काही छायाचित्रे काढली असून ती उडत्या तबकड्यांची आहेत, असे त्याचे म्हणणे आहे. कारण अशा प्रकारची कोणतीही विमाने पृथ्वीवर निर्माण होत नाहीत. मात्र, हे रहस्य केवळ आकाशापुरतेच मर्यादित नाही. तर, येथील जुनो या स्थानापासून उटकियागेव्हीक या उत्तरेतील बिंदूपर्यंतच्या अंतरात 1970 पासून आजवर 20 हजारांहून अधिक माणसे गायब झाली आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याचे कोणतेही कारण सापडलेले नाही. तसेच त्यांच्या शरीराचे कोणतेही भाग सापडलेले नाहीत. अख्खी माणसेच गायब असल्याचे पोलिसांचेही म्हणणे आहे. त्यामुळे या स्थानासंबंधी बरेच भयही लोकांच्या मनात असल्याचे आढळून येते. एकंदर, हे स्थान रहस्यमय आहे, यावर सर्वांचेच एकमत असल्याचे दिसून येते.