दुचाकी चोरीचे 5, चेन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड; शाहूपुरी पोलिसांची कारवाई
बेळगाव प्रतिनिधी
रेकी करून दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन सख्ख्या भावंडांना शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटकातून जेरबंद केले. अशरफअली शेरअली नगारजी (वय 19) आणि सैफअली शेरअली नगारजी (वय 23, दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीच्या 5 दुचाकी आणि 7 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील अशरफअली आणि सैफअली हे दोघे सीमाभागातील सराईत चोरट्यांच्या टोळीत सक्रीय आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी सदर बाजार येथे एक खोली भाड्याने घेतली. त्यानंतर अन्य दोन साथीदारांसह रेकी करून ते दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार करीत होते. गुन्हे केल्यानंतर चारही संशयित खोली सोडून कर्नाटकात गेले होते. यातील दोघांना कर्नाटकातील रायलपाडू (जि. कोलार) आणि हनूर (जि. चामराजनगर) पोलिस ठाण्यात दैनंदिन हजेरी लावणे बंधनकारक असल्याची माहिती मिळताच, शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी पत्रव्यवहार करून दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत नगारजी बंधूंनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन 12 गुन्हे केल्याची कबुली दिली. यात दुचाकी चोरीचे पाच गुन्हे, तर जबरी चोरीच्या सात गुह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी आणि जबरी चोरीतील चार मंगळसूत्र, एक बोरमाळ, एक मोहनमाळ आणि सोन्याचा सर असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक फौजदार संदीप जाधव, संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेकर, विकास चौगुले, महेश पाटील, वीरेंद्र वडेर, आदींनी केली.
सदर बाझारमध्ये वास्तव्य
निपाणी येथील एका खूनाच्या गुह्यात संशयीत आरोपी आहेत. सदर बाझारमध्ये राहण्यास होते. चोरीचे गुन्हे करुन हे कोल्हापूरातच राहत होते. तसेच जिह्यात विविध ठिकाणी दोन दोन दिवस रेकी करुन आपले सावज हेरत असल्याची माहितीही समोर आली आहे.
चैनी, वकीलाचा खर्च भागवण्यासाठी चोऱ्या
अशरफअली आणि सैफअली या दोघांवर निपाणी पोलीस ठाण्यामध्ये खूनाचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. याखटल्यात त्यांना झालेला खर्च भागविण्यासाठी त्यांनी चोरीतील पैशाचा वापर केला असता अशी माहिती समोर आली आहे. तसेच चैनीसाठीही त्यांनी या पैशाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
शाहूपुरी डी. बी. अॅक्टीव्हमोडमध्ये
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डीबी पथक सध्या अॅक्टीव्हमोडमध्ये आले आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने 13 जबरी चोरीचे गुन्हे, 3 आर्म अॅक्ट, मोटरसायकल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.