माऊंट मनास्लू पर्वतावर दुर्घटना ः अनेक जखमी
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळच्या माऊंट मनास्लू पर्वतावर सोमवारी प्रचंड हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बचाव आणि शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. कॅम्प-4 च्या खालील भागातील मार्गावर हिमस्खलन झाल्याची घटना घडली. सेव्हन समिट टेक्स, सटोरी ऍडव्हेंचर, इमॅजिन नेपाळ टेक्स, एलिट एक्सपिडिशन आणि 8-के एक्सपिडिशनमधील शेर्पा गिर्यारोहक जखमी झाले आहेत. आपल्या पथकातील पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे इमॅजिन नेपाळ टेक्सचे दावा शेर्पा यांनी सांगितले. तसेच आपल्या पथकातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सटोरी ऍडव्हेंचरचे ऋषी भंडारी यांनी सांगितले.