बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीनिमित्त गर्दी
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जमलेली गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे दुर्घटनेचे गालबोट लागले. चेंगराचेंगरीत गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली. नोएडा येथील निर्मलादेवी आणि जबलपूर येथील राजकुमार अशी मृतांची नावे आहेत. गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले. आरती सुरू होण्यापूर्वीच गर्दीचा ताण वाढू लागल्यामुळे गुदमरल्याने काहीजण बेशुद्ध झाल्याचेही सांगण्यात आले. अत्यवस्थ असलेल्यांसह सुमारे 50 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मुथरेतील बांके बिहार मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरात होणारी मंगला आरती वर्षातून एकदाच केली जाते. साधारण पहाटे 3 ते 4 च्या सुमारास ही आरती केली जाते. जगभरात ही आरती प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक आरतीसाठी उपस्थित राहतात.