केरळच्या एर्नाकुलम येथील धक्कादायक घटना : पोलिसांकडून गुन्हा नोंद
वृत्तसंस्था / एर्नाकुलम
गूगल मॅपचा वापर आपण सर्वजण करतो, परंतु मॅपकडून चुकीची दिशा दाखविण्यात आल्याने एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण? केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात जीपीएसकडून चुकीचा मार्ग दाखण्या आल्याने दोन डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे.
एर्नाकुलम जिल्ह्यात एक कार नदीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनुसार मृतांमध्ये 29 वर्षीय अद्वैत आणि 29 वर्षीय अजमल यांचा समावेश आहे. दोघेही पेशाने डॉक्टर होते. दुर्घटनेवेळी दोघेही स्वत:च्या तीन अन्य मित्रांसोबत जन्मदिनाची पार्टी करून परतत होते.
कारचालक गूगल मॅप्सकडून दाखविण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करत दुर्घटनेच्या क्षेत्रात पोहोचला. ही घटना रविवारी गोथुरुथनजीक घडली आहे. डॉक्टर कारद्वारे कोडुंगल्लू येथे परतत होते, कथितपणे घरी जाण्यासाठी ते गूगल मॅपच्या सेवेची मदत घेत होते. चालकाने नदीला पाण्याने भरलेला रस्ता समजून कार पुढे नेल्याने कार पेरियार नदीत कोसळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दुर्घटनवेळी अतिवृष्टीमुळे दृश्यमानता कमी होती. याचबरोबर नदीवर कुठलेच बॅरिकेड तसेच साइनबोर्ड नव्हते. कार नदीत कोसळल्यावर स्थानिक लोकांनी प्रवाशांना वाचविण्यासाठी धाव घेतली. स्थानिकांनी तीन प्रवाशांना या दुर्घटनेतून वाचविले आहे. या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत्युमुखी पडलेले दोन्ही डॉक्टर हे कोडुंगल्लूरच्या एआर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. पोलिसांनी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे.