वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील येचेऑन येथे झालेल्या आशियाई यू-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी भारताला दोन सुवर्णपदके मिळाली. भारताच्या लक्षिता विनोद सँडिलाने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत महिलांच्या 1500 मी. शर्यतीचे तर 4×400 मी. महिला रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. पदकतक्त्यात भारताने 19 पदकांसह तिसरे स्थान मिळविले.
लक्षिता सँडिलाने 1500 मी. शर्यतीत 4:24.23 से. वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. तिने याआधीची आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 4:26.48 से. वेळ मागे टाकली. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्ण होते. त्यानंतर रेझोआना मलिक हीनाच्या नेतृत्वाखालील महिला रिले संघाने 3:40.49 सेकंद अवधी घेत भारताला सहावे सुवर्ण मिळवून दिले. या प्रकारात कझाकला रौप्य व कोरियाला कांस्यपदक मिळाले.
भारताच्या पुरुषांच्या 4×400 मी. रिले संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 3:08.78 सेकंद वेळ नोंदवली. पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीत मेहदी हसनने कांस्य मिळविताना 3:56.01 से. वेळ नोंदवली तर पुरुषांच्या 5000 मी. शर्यतीत शिवाजी परशू मादप्पागौडरने रौप्य पटकावताना 14:49.05 से. वेळ नोंदवली.
भारताने या स्पर्धेत 6 सुवर्ण, 7 रौप्य, 6 कांस्यपदकांसह एकूण 19 पदके जिंकत तिसरे स्थान मिळविले. जपानने 14 सुवर्ण, 4 रौप्य, 5 कांस्यपदकासह पहिले, चीनने 11 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्यपदकांसह दुसरे स्थान पटकावले. रविवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रेझोआना मलिक हीना व भरतप्रीत सिंग यांनी भारताला दोन सुवर्ण मिळवून दिले होती. त्यानंतर गोळाफेकमध्ये सिद्धार्थ चौधरीने सोमवारी तर सुनील कुमारने मंगळवारी डेकॅथ्लॉनचे सुवर्ण मिळविले होते. भारताने या स्पर्धेत 45 सदस्यीय संघ उतरवला होता, त्यात 19 महिलांचा समावेश होता.