वृत्तसंस्था/ येचेऑन (कोरिया)
भारताचे युवा व गुणवान अॅथलीट रेझोआना मल्लिक हीना आणि भरतप्रीत सिंग यांनी आशियाई 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला दणदणीत सुरुवात करून देताना आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. त्यांनी अनुक्रमे महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि थाळीफेक गटांत ही कामगिरी करून दाखविलेली आहे.
रेझेआना ही उभरती अॅथलीट असून तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भरीव कामगिरी करून दाखविली. तिने ही शर्यत 53.31 सेकंद अशा उल्लेखनीय वेळेत पूर्ण केली. तिची वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी 53.22 सेकंदांची असून त्यापेक्षा ती किंचित कमी पडली. मात्र हीनाच्या या कामगिरीने भारताला सुवर्ण मिळवून देण्याबरोबर अॅथलेटिक्समधील उगवती अॅथलीट म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी एप्रिलमध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई 18 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेतही तिने सुवर्ण जिंकले होते.
दुसरीकडे, पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत भरतप्रीत सिंगने आपली ताकद दाखवून दिली. त्याने 55.66 मीटर्स अंतरावर थाळी फेकून भारताला सुवर्ण मिळवून दिले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या यशाने भारताचा हुरुप वाढविला असून आणखी यश मिळण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. याशिवाय अंतिमा पालने महिलांच्या 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यंतीत कांस्यपदकाची कमाई करून दाखविली. तिने 17 मिनिटे व 17.11 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.