पुराभिलेखातील जोडगोळी पोहोचली कोठडीत : एसआयटीकडून आतापर्यंत चारजणांना अटक
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात सरकारी कर्मचाऱयांचा सहभाग असल्याचे उघड होताच विशेष तपास पथकाने (एसआयटी) काल शुक्रवारी दोन सरकारी कर्मचाऱयांना अटक केली आहे. पुरातत्व व पुराभिलेख खात्यातील जमिनींच्या कागदपत्रात फेरफार करून बनावट दस्तावेज तयार करण्याच्या कामात गुंतलेला धिरेश नाईक व शिवानंद मडकईकर यांना अटक केली आहे.
शिवानंद मडकईकर याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची सखोल उलटतपासणी करून शुक्रवारी संध्याकाळी त्याला अटक केली. धिरेश नाईक याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची सखोल उलटतपासणी केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्याला अटक केली होती. शुक्रवारी धिरेश याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शिवानंद मडकईकर याला आज शनिवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
आतापर्यंत चारजणांना अटक
जमीन घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यात विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल सफी तसेच शिवानंद मडकईकर व धिरेश नाईक यांचा समावेश आहे.
पुराभिलेखातील जोडगोळी आता कोठडीत
धिरेश नाईक हा 2006 साली पुरातत्व व पुराभिलेख खात्यात कामाला लागला होता. शिवानंद मडकईकर व धीरेश हे दोघेही मित्र असून एकाच खात्यात काम करीत होते. दोघांची ही जोडगोळी मिळून हा काळा कारभार करीत असल्याचे उघड झाले आहे. दोघेही आता कोठडीत पोहोचले आहेत.
लँडमाफिया विक्रांत शेट्टीला जामीन मंजूर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जमीन घोटाळय़ाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर लगेच आसगाव येथील जमीन हडप केल्याप्रकरणी मडगावातील लँडमाफिया विक्रांत शेट्टी याला अटक केली होती. विक्रांत शेट्टीने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जमिनासाठी अर्ज दाखल केला होता. काल शुक्रवारी त्याच्या अर्जवर सुनावणी झाली असून त्याला न्यायालयाने सशर्थ जामीन मंजुर केला आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक निधीन वालसन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी कार्यरत आहे. आसगाव येथील जमीन हडप प्रकरणात अवघ्या काही दिवसातच पहिल्या संशयिताला, मडगावातील विक्रांत शेट्टीला एसआयटीने अटक केली. त्यानंतर सांत ईनेज पणजी येथील महम्मद सुहेल सफी याला आणि आता धिरेश नाईक व शिवानंद मडकईकर याला मिळून आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात यश मिळविले आहे.
एसआयटीकडे आतापर्यंत 70 जमीन घोटाळय़ाची प्रकरणे आली आहेत. पुरातत्व व पुराभिलेख खात्यातील कर्मचारी एसआयटीच्या गळाला लागल्याने आता बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडप करणाऱया तसेच त्यांची विक्री करणाऱया अन्य लँडमाफिया एसआयटीच्या जाळ्यात अडकतील. पुढील काही दिवसांत अशा प्रकरणात गुंतलेल्यांचे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे.