सहकाऱ्याच्या गोळीबारात गमावला जीव
वृत्तसंस्था/ आयझोल
मिझोरम सशस्त्र पोलीस दलाच्या दोन कर्मचाऱ्यांची कोलासिब जिल्ह्यात त्यांच्याच एका सहकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी या घटनेची माहिती दिली आहे. सशस्त्र दलाच्या दुसऱ्या बटालियनचे तीन पोलीस कर्मचारी मिझोरम-आसाम सीमेनजीक बुआर्चेप गावात एका चौकीवर तैनात असताना ही घटना घडली आहे. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोधात तक्रार केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी संतप्त झाला होता असे सांगण्यात येत आहे.
आरोपी पोलीस कर्मचारी कांति चकमाने स्वत:च्या सर्व्हिस रायफलद्वारे 15 वेळा गोळीबार केला आहे. त्याच्याकडून झालेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी लालरोहलुआ आणि इंद्रकुमार राय यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक लालबियाकथंगा खियांग्ते यांनी दिली आहे. कांति चकमाने कुठल्या कारणातून हा गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी चालविली आहे.